

Aishwarya Rai Poem
esakal
किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com
काही कविता काळाच्या ओघात जुन्या होतात; पण काही आपल्या बोलीचा गोडवा आणि एखाद्या काळाची गंमत सोबत घेऊन पुन्हा पुन्हा नव्याने भेटत राहतात. मी केलेली ‘ऐश्वर्या राय’ ही माझी अशीच एक कविता. तेव्हा रंगलेल्या या कवितेची गंमत आजच्या नव्या पिढीलाही भावते आहे, हीच तिच्या आणि आपल्या बोलीच्या जिवंतपणाची पावती आहे.
२००७ मध्ये एका दूरदर्शन वाहिनीवर ‘हास्यसम्राट’ कार्यक्रम आला होता. त्याला मराठी वाहिन्यांवरील पहिला रिॲलिटी कॉमेडी शो म्हणता येईल. विदर्भातून प्रसिद्ध वऱ्हाडी विनोदी कवी स्व. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासोबत अगदी अंतिम फेरीपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. अशा प्रकारचा हा पहिलाच विनोदी कार्यक्रम असल्यामुळे एकूणच मराठी प्रेक्षकांना त्याचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे त्याला लोकप्रियतादेखील तसेच लाभली. महेंद्र कदम हे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक होते. जितेंद्र जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते; तर अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदी कवी अशोक नायगावकर परीक्षक म्हणून काम पाहत होते.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले विनोदी कलावंत आपापल्या बोलीतून सादरीकरण करीत होते. त्यामुळे सर्वत्र मराठी रसिकांना हा कार्यक्रम आपलासा वाटत होता. बोलीभाषा म्हटल्यानंतर नाक मुरडणारे लोक यापूर्वी आम्ही अनुभवले होते; परंतु या कार्यक्रमात मात्र अत्यंत प्रतिष्ठेने बोलीभाषेतील सादरीकरण होत होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वऱ्हाडी, पुणेरी, अहिराणी, नागपुरी, आगरी, खानदेशी अशा वेगवेगळ्या बोलींमधील गोडवा मराठी प्रेक्षकांना अनुभवता येत होता. आज ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शासनाने बहाल केला आहे, तिची अभिजातता खरे तर या बोलींमध्येच दडलेली आहे, हे यासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित होत होते.