

American Exceptionalism
esakal
डॉ. सदानंद मोरे
मातृदेशाशी फारकत घेऊन अमेरिकेला आपला राजकीय-मानवतावादी विकास करता आला. जगात व युरोपातच काय, परंतु खुद्द इंग्लंडमध्येही पूर्णतेने नसलेल्या स्वातंत्र्य आणि स्वयंशासन या मूल्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना करून देता आला, हे तर स्पष्टच होते. या मूल्यांचा लाभ सर्व जगाला करून द्यायचा आणि तोही भेदभावविरहित पद्धतीने, हा अमेरिकेच्या इतिहासदत्त कर्तव्याचाच भाग असल्याचा पवित्रा विल्सन घेतो.
आ पल्या भाषणात विल्सनने अमेरिकेचा म्हणजे अर्थातच अमेरिकेतील लोकांचा स्वभाव आणि त्यांनी घेतलेले व्रत ऊर्फ ‘मिशन’ यांचा विचार केंद्रस्थानी ठेवलेला दिसतो. त्याशिवाय भाषणात ‘Ideals of America’ असे शीर्षक त्यासाठी वापरायला कोणीच धजला नसता. या सर्व प्रकाराला अमेरिकेची ‘अपवादात्मकता’ - American Exeptionalism असे म्हटले जाते. जगातील इतर सर्वसाधारण राष्ट्रांपेक्षा आपण वेगळे, खरेतर श्रेष्ठच आहोत असे या अपवादात्मकतेच्या जाणिवेत अनुस्यूत असते. म्हणजे काय, तर इतर राष्ट्रे युद्धपिपासू, वसाहतवादी, साम्राज्यवादी, राज्यसत्तावादी, प्रजेला स्वातंत्र्य न देता तिच्यावर सत्ता गाजवणारी, स्वयंनिर्णयाच्या विरोधातील आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रांच्या प्रजेला जाच सहन करावा लागतोच, खऱ्या स्वातंत्र्यांचा उपभोग घेता येत नाहीच. परंतु याशिवाय ही राष्ट्रे एकमेकांशी युद्धरत असतात. एकमेकांवर मात करून दुसऱ्यांचा प्रदेश गिळंकृत करू पाहतात. यापैकी कोणतीही गोष्ट अमेरिका करीत नाही. याला अपवादात्मक म्हणायचे नाही तर आणखी काय?