

Amitabh Bachchan
esakal
भारतीय सिनेसृष्टीचा विचार करताना ‘अमिताभ बच्चन’ या नावाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. संवादफेक, देहबोली, नृत्य, गायन, पेहराव, चरित्रांमधली विविधता अशा सगळ्याच आघाड्यांवर परिपूर्ण असलेल्या ह्या कलाकाराच्या अचाट प्रतिभेला शिस्त, वक्तशीरपणा, कामाप्रती प्रामाणिकता आणि सुसंस्कृततेची जोड मिळाल्यानंतर केवळ ‘अमिताभ’ नावाचा सुपरस्टारच घडू शकतो.
क वी, गीतकार जावेद अख्तर अमिताभ बच्चनविषयी बोलताना म्हणतात, ‘‘अमिताभ बनना कोई आसान काम नही । कोई उतना टॅलेंटेड हो, जितने वो है, उतना डिसिप्लीन्ड हो, जितने वो है, उतना फोकस्ड हो, जितने वो है, और बातचीत मे उतना समझदार हो, जितने वो है । डिसिप्लिन, काॅन्सन्ट्रेशन, टॅलेंट, मेहनत... इतना सारा एकही जगह पाना मुश्किल काम है ।’’ खरंच आहे, अमिताभ बच्चन हे नाव यशाच्या आणि लोकप्रियतेच्या कुठल्याही मापदंडाच्या पार जाऊन बसलं आहे. छप्पन्न वर्षांची दीर्घ कारकीर्द अजूनही मध्यान्हीच असावी अशी तळपत आहे. सर्व बाजूंनी पारखून झालं पण ह्या माणसातल्या अफाट ऊर्जेचं, मेहनतीचं, प्रतिभेचं, लोकप्रियतेचं आणि कामातील तन्मयतेचं इंगीत सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचं आहे.