

Nostalgic Indian parents return from USA
esakal
अमेरिकेत सगळीकडे निसर्गाची मुक्त उधळण, शरीरात भिनणारा हिमगारवा होता. कुठं धुळीचा कण नाही की घाणीचं नाव नाही. पण या सगळ्याबरोबरच आसमंतात भरून राहिलेली एक नीरव शांतताही होती! रस्त्यानं माणसं सोडा, पण कुत्रीदेखील कधी भुंकत जाताना दिसली नाहीत. संध्याकाळी मुलीबरोबर गाडीतून बाहेर पडायचो तेव्हा मजा वाटायची.
आम्ही आमची पाचवी अमेरिका ट्रीप संपवून मायदेशी परत निघालो होतो. आमच्या विमानानं सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावरून उड्डाण केलं आणि मी सीटच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून घेतले. क्षणभर एकटेपणानं मन झाकोळल्यासारखं झालं. इतका वेळ विमानात चढण्याच्या, सामान ठेवण्याच्या गडबडीत, सिक्युरिटीतून पुढे जाईपर्यंत तासभर तिष्ठत असणाऱ्या तेजूचा - माझ्या थोरल्या कन्येचा चेहरा, तिचे अश्रूंनी भरलेले डोळे सतावत होते. दहादा दूरवर उभ्या असलेल्या तिला बाय करत होतो. शेवटी ती नजरेआड झालीच.