विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
अमेरिकेची इच्छा असो अथवा नसो जागतिक पातळीवर अशा प्रकारची भूमिका पत्करण्याची व निभावण्याची वेळ अमेरिकेवर लवकरच यायची होती. अर्थात त्यासाठी तिला आपल्या भौगोलिक वसाहती स्थापन करून त्यांच्यावर प्रत्यक्ष राजसत्ता गाजवण्याची गरज नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकारणात वारंवार हस्तक्षेप करून आपल्याला हवी असलेली व्यवस्था निर्माण करायचे तिचे कार्य तिच्या पद्धतीने अजूनही सुरूच असल्याचा तिचा दावा आहे.
ब्रिटिश साम्राज्याच्या कुंडलीमधील चतुर्ग्रहाची चर्चा करताना एक बाब लक्षात येते. तिच्यातील ऱ्होड्स, किपलिंग आणि चर्चिल हे ग्रह जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशात केव्हाही भ्रमण करू शकत होते. त्यात ना त्यांना स्वतःकडून अडथळा होता, ना त्यांच्या देशातील चालीरीतींचा. चौथ्या ग्रहाची म्हणजे महात्मा गांधींची गोष्ट मात्र वेगळी होती. गांधी बॅरिस्टर होऊन भारतात परत आल्यानंतर परदेशगमनाच्या पातकाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना चक्क त्र्यंबकेश्वराला येऊन काही एक विधी करावा लागला. इकडे चर्चिल आणि किपलिंग यांच्या भारत, आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या हव्या तेवढ्या चकरा होत असताना त्यांना याची गरज पडली नव्हती. इंग्लंडचे साम्राज्य का झाले आणि भारताचे का होऊ शकले नाही याचे एक उत्तर या तुलनेतून मिळायला हरकत नसावी.