सारिका फुंडे
पाळीव प्राणी मानसिक शांततेचा स्रोत असतात,कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात, हे जाणून कायदाही त्यांच्या बाजूने आहे. त्यांना दुखवणे, त्यांच्यावर अन्याय करणे हा गुन्हा आहे. त्याचवेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि इतर रहिवाशांशी सौहार्द राखण्यासाठी पालकांनीही जबाबदारीने वागायला हवे.
पाळीव प्राणी अनेकांसाठी एक मानसिक आधार असतात. एकाकीपणा, तणाव किंवा दररोजच्या धावपळीच्या जीवनातून माणूस आपल्या पाळीव प्राण्यांच्या सहवासात निवांतपणा शोधतो. अनेक घरांमध्ये कुत्रा, मांजर, ससा, मासे, पोपट यांसारखे प्राणी कुटुंबाचा अविभाज्य भाग झालेले असतात. अशा पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेले काही कायदे आणि त्याचवेळी पालकांनी पाळायचे काही नियम यांविषयी माहिती असायला हवी.
कायदा काय सांगतो?
भारतीय संविधानाच्या कलम ५१(ए)(जी)नुसार प्रत्येक नागरिकाने निसर्ग आणि प्राण्यांचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे. म्हणजेच, केवळ प्राणी पाळणेच नव्हे, तर त्यांच्या कल्याणासाठी काम करणे हाही एक नागरिकधर्म मानला जातो. याशिवाय भारत सरकारने १९६०मध्ये लागू केलेला प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट (Prevention of Cruelty to Animals Act) हा कायदा प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाला रोखतो. या कायद्यानुसार प्राण्यांना उपाशी ठेवणे, त्यांना मारहाण करणे, इजा पोहोचवणे किंवा त्यांच्याशी अमानुष वागणूक करणे या कृत्यांना गुन्हा मानले जाते. या गुन्ह्यांवर दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.