

Why Spending Money Is Difficult
esakal
डॉ. अनंत सरदेशमुख
करोडो कमावलेले अनेक आर्थिकदृष्ट्या यशस्वी लोकदेखील पैशाशी असलेल्या त्यांच्या नात्यात अडकलेले, असमाधानी आणि अस्वस्थ असतात. याचे कारण म्हणजे पैसे कमावणे हे बुद्धीचे आणि शिस्तीचे काम आहे, तर पैसे खर्च करणे हे भावनांचे, इतिहासाचे आणि आत्मभानाचे काम आहे.
पैसे कमावणे ही एक कला आहे, हे आपण अनेकदा ऐकतो. शाळेपासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत, गुंतवणुकीच्या क्लृप्त्यांपासून, युक्त्यांपासून ते बचतीच्या सवयींपर्यंत पैसे कसे मिळवायचे आणि कसे वाढवायचे याचे शिक्षण आपल्याला आपले पालक, मित्र, वर्तमानपत्रे, मासिके, पैसे खर्च करून नेमलेले अर्थ सल्लागार असे कुठे ना कुठे मिळत राहते. पण पैसे खर्च कसे करायचे, हे कोणी शिकवते का? हो. थोड्या प्रमाणात आपले वडील आणि काही वडील माणसे हे शिकवतात, पण ते त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगांतून निर्माण झालेल्या स्वसंपादित सिद्धांतांतून. एकंदर हा खर्च कसा फिजूल, अयोग्य आहे असे पायलीला पन्नास सल्ले आपण खर्च केल्यावर आपल्याला फुकट मिळत असतात. पण पैसे खर्च कसे करावे याचे ज्ञान कोणी देत नाही, आणि दिले तरी ते आपल्याला फारसे रुचणारे नसते. परंतु, आता असे काही सल्ले किंवा खर्चाचे शास्त्र सांगणारे मॉर्गन हाउसेललिखित द आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी ः सिंपल चॉइसेस फॉर अ रिचर लाइफ हे एक रंजक पुस्तक उपलब्ध झाले आहे. गंमत अशी आहे की भारतीय संस्कृतीत हा विचार नवा नाही. आपल्या संतांनी आणि तत्त्वज्ञांनी शेकडो वर्षांपूर्वीच धन, व्यवहार आणि विरक्ती यांचा समतोल कसा साधावा, याचे मार्गदर्शन करून ठेवले आहे, परंतु यावर एकत्रित असे लिखाण झालेले दिसून येत नाही. पैसे मिळवणे आणि पैसे शहाणपणाने वापरणे या दोन पूर्णपणे वेगळ्या कौशल्यांची गरज मानवाला असते. करोडो कमावलेले, आर्थिकदृष्ट्या यशस्वी असलेले अनेक लोक पैशाशी असलेल्या त्यांच्या नात्यात अडकलेले, असमाधानी आणि अस्वस्थ असतात. याचे कारण म्हणजे पैसे कमावणे हे बुद्धीचे आणि शिस्तीचे काम आहे, तर पैसे खर्च करणे हे भावनांचे, इतिहासाचे आणि आत्मभानाचे काम आहे.