योगेंद्र जोशी
डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जगातही सौंदर्याची उधळण असते, हे विज्ञानाच्या नजरेतून कलाकृती शोधणाऱ्या एका अनोख्या प्रयोगातून सिद्ध होतं आहे - आर्ट विथ केमिस्ट्री! साखर, युरिया, व्हिटॅमिन सी यांसारख्या साध्या रसायनांपासून मायक्रोस्कोपखाली साकार होणारी ही सूक्ष्मचित्रं म्हणजे विज्ञान आणि कलेच्या विलक्षण संगमाचं अप्रतिम उदाहरण आहे.
फोटोग्राफीच्या अद्भुत जगात तुम्ही अनेक विस्मयजनक कलाकृती पाहिल्या असतील. मात्र, कधी विचार केला आहे का, साखरेच्या एका कणातही रंगीत फुलांचे सौंदर्य दडलेले असू शकते? किंवा क्रोसिन आणि युरियाच्या संयोजनातून डोंगर-दऱ्यांचे नयनरम्य चित्र उभे राहू शकते? व्हिटॅमिन सीपासून मोरपिसासारखा नाजूक आकार तयार होतो, पण तो इतका सूक्ष्म असतो की मानवी डोळ्यांना दिसतही नाही. अगदी आपल्या अश्रूंमध्येही अदृश्य कला दडलेली असते! ही कला आहे रसायनांमधली... ‘आर्ट विथ केमिस्ट्री’!
आर्ट विथ केमिस्ट्री म्हणजेच रसायनांतून साकारलेली सूक्ष्म-कला हा अनोखा आणि दुर्लक्षित कलाप्रकार आहे. यात विविध रासायनिक पदार्थांच्या संयोजनातून सूक्ष्म स्वरूपात निर्माण होणाऱ्या निसर्गनियमांवर आधारित कलाकृती फोटोग्राफीच्या साहाय्याने टिपल्या जातात. अत्याधुनिक सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) आणि विशेष प्रकाशशास्त्र वापरून त्या दृश्यमान केल्या जातात. या कलांमध्ये विज्ञान आणि सौंदर्य यांचा अपूर्व संगम दिसतो.
भारतामध्ये अजून या क्षेत्राची फारशी ओळख नाही. मात्र हे एक असे जग आहे, ज्यात विज्ञानाच्या माध्यमातून कलासौंदर्य अनुभवता येते. हे असे विस्मयकारक सौंदर्य असते जे डोळ्यांना दिसत नाही, पण अंतर्मनाला नक्की जाणवते.