संबित पाल
तंत्रज्ञानात अफाट वेगाने झालेल्या प्रगतीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी कोणतीही घटना आपल्यापर्यंत क्षणार्धात पोहोचू लागली. आता त्यापुढे जाऊन ‘न घडलेली’ घटनासुद्धा ‘घडली आहे’ असा विश्वास बसावा, अशा पद्धतीने आपल्यासमोर आणणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे विकसित झालेल्या या तंत्रज्ञानाचा हा सर्वांगाने मागोवा...
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. श्रीलंकेतील उत्खननात एक महाकाय तलवार सापडल्याचा दावा करणारे काही फोटोंचे एक कोलाज केलेले होते. ही तलवार रावणाचा भाऊ कुंभकर्णाची असल्याचे सांगितले जात होते.
असा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअॅपवर किंवा सोशल मीडिया फीडमध्ये आला असता तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असती? हा एक उल्लेखनीय शोध आहे असं वाटून उत्साहाच्या भरात तो मित्रांसोबत वा कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा मोह आपल्यातील अनेकांना झाला असता!
तथापि, ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयद्वारे निर्माण केलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेले सर्व फोटो एआय तंत्र वापरून ‘तयार’ केल्याचे तथ्य-तपासणी केल्यावर उघड झाले.