डॉ. राजेंद्र शेंडे
एआय तंत्रज्ञानासाठी लागणारी डेटा सेंटर्स आणि तेथील तंत्रज्ञानासाठी कुलिंग सिस्टीम वापरली जाते. यातून जगातील एकूण उत्सर्जनापैकी तीन टक्के उत्सर्जन होते. हे प्रमाण जगातील एकूण हवाई प्रवासामुळे होणाऱ्या उत्सर्जनाइतके आहे. मात्र, एकुणातच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्यादृष्टीने पाहायचे झाल्यास, एआयचा वेग आणि त्याचे स्वरूप यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याची क्षमतादेखील एआयमध्येच आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची सोपी व्याख्या म्हणजे, संगणक प्रणालीची विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता. जी ठरावीक कामे आत्तापर्यंत केवळ मानव करू शकत होता, ती कामे करण्यास संगणक यंत्रणाही एआयमुळे सक्षम होत आहे.
यात प्रामुख्याने भाषा प्रक्रिया (लँग्वेज प्रोसेसिंग), कोणत्याही समस्या सोडविणे आणि एखाद्या परिस्थितीतून शिकणे याचा समावेश होतो. एआय म्हणजे एक तंत्रज्ञानाधारित टूल आहे, ज्याचा वापर करून संगणक हुशारीने कामे पार पाडतो, जे त्याच्या नावातच आहे. हे सर्व नैसर्गिक नव्हे, तर आर्टिफिशियल अर्थात कृत्रिमरित्या होत आहे.