

Nature Conservation by Artists in India
esakal
‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं’ असं म्हणत जवळपास ३५०-४०० वर्षांपूर्वी संत तुकारामांनी झाडांचं, निसर्गाचं महत्त्व सांगितलं! तुकोबांच्या याच उक्तीला प्रमाण मानत, ‘एक झाड, एक कलावंत, एक ग्रंथालय’ या संकल्पनेअंतर्गत aमाळरानावरील ३० एकर जागेत जवळपास १८०० झाडांचं कुटुंबच उभं केलंय!
‘कला’ हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय! असं म्हटलं जातं, की कला देवापर्यंत पोहोचण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे! कलावंत खरंच विलक्षण असतात. आपल्या कलेद्वारे नेहमीच सर्जनशीलतेचा आणि नावीन्याचा शोध घेणारे कलाकार आणि त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत कलाकृती पाहिल्या, की बरेचदा थक्क व्हायला होतं. कलाकार एखादी कला साकारताना आपल्या कलेत पूर्णपणे हरवून जाऊन समाधी अवस्था गाठतो, त्यावेळी नितांत सुंदर कलाकृती जन्मास येते. कलाकार आणि त्याची कला जेव्हा समाजाशी जोडली जाते, तेव्हा चमत्कार घडतो! काही दिवसांपूर्वी मी अशाच एका कलाकाराला भेटलो. ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं’ असं म्हणत जवळपास ३५०-४०० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी झाडांचं, निसर्गाचं महत्त्व सांगितलं होतं! तुकोबांच्या याच उक्तीला प्रमाण मानत सचिन निंबाळकर हा पुण्यातील कलाकार निसर्गाचं सौंदर्य जपण्यासाठी धडपडतोय! ‘एक झाड, एक कलावंत, एक ग्रंथालय’ या संकल्पनेअंतर्गत पुण्याच्या दौंड तालुक्यातील पांढरेवाडी इथल्या खडकाळ माळरानावरील ३० एकर जागेत जवळपास १,८०० झाडांचं एक कुटुंबच निंबाळकरांनी उभं केलंय! आणि विशेष बाब म्हणजे यातल्या प्रत्येक झाडाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचं नाव दिलं आहे. स्वतःचा शोध घेताना चित्रकलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज या वनराईपर्यंत येऊन पोहोचला आहे.