

सुगंध ही केवळ अनुभवण्याची चीज. सुगंध ना दिसतो, ना त्याला हातात पकडता येतं. पण अनुभव जितका खोल, जितका वैयक्तिक, जितका हृदयाला भिडणारा, तेवढा सुगंधही मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुजणारा. काळाच्या ओघात काही गोष्टी विस्मृतीत जातात, चेहरे धूसर होतात, तेव्हा एखादा सुगंध आठवणींचा कोपरा उजळवून टाकतो.
परवा-परवाची गोष्ट. सिग्नलला थांबले होते. ग्रीन सिग्नल लागायला अवकाश होता. आजूबाजूला वाहनांची गजबज नको तितकी जाणवत होती. त्यातच नाक हुरहुळू लागलं; वाहनांच्या धुराचा वास, प्रदूषणाचा वास, त्यात मिळसळलेला शेकोटीच्या धुराचा वास, डोकं उठावं अशा स्ट्राँग परफ्युमचा वास... नको नको वाटू लागलं. तेवढ्यात शेजारी एक अवाढव्य बाइक येऊन थांबली. त्यावर मागे बसलेली ती सुडो-सोफिस्टिकेटेड व्यक्ती सोबतच्या व्यक्तीला काही सांगत होती. दुसऱ्यांचं बोलणं मुद्दाम ऐकू नये, पण ती असं काही बोलत की माझे कान टवकारलेच. ‘मला ना साजूक तुपाचा वास अजिबात आवडत नाही, आय सिम्पली हेट इट!’ साजूक तुपाचा वास न आवडणारी ती व्यक्ती मला त्याक्षणी परग्रहावरून आल्यासारखी वाटली. असते एकेकाची आवड असं म्हणून मनाची समजूत घातली आणि पुढे निघाले, पण साजूक तूप काही केल्या डोक्यातून जाईना...