

Warkari tradition legacy
esakal
एकनाथ महाराज जळगावकर
वारकऱ्यांच्या तेजस्वी परंपरेतील एक महत्त्वाचे स्थान म्हणजे चैतन्य सद्गुरू बाळाजी महाराज जळगावकर फड व दिंडी. अनेक पिढ्यांपासून अविरतपणे सुरू असलेली ही परंपरा आजही भजन, कीर्तन, दिंडी आणि नामस्मरणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची पताका उंचावत आहे. संतांच्या शिकवणीचा प्रसार करत असंख्य भाविकांना भक्तिमार्गाशी जोडण्याचे महान कार्य या फडामार्फत सातत्याने सुरू आहे.
चैतन्य सद्गुरू बाळाजी महाराज जळगावकर यांनी स्वतः जळगावकर फड व दिंडीची स्थापना केली. मल्लाप्पा महाराज वासकर यांचे ते समकालीन होते. ते महान भगवद्भक्त व महात्मे होते. ‘हरिभजनी हे ढवळीले जग । चुकविला लाग
कळीकाळाचा ।।’ या संतवचनानुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी भागांमध्ये समाज प्रबोधन करून त्यांनी अनेकांना भक्तिमार्गाला लावले. नामभक्ती, सत्संग आणि संतविचारांच्या माध्यमातून समाजामध्ये सदाचार, प्रेम आणि समतेची भावना रुजविण्याचे कार्य त्यांनी केले.
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवसांत भजन, कीर्तन आणि दिंडी यांच्या माध्यमातून पंढरीरायाची सामूहिक भक्ती सुरू झाली. या परंपरेमुळे अनेक वारकरी नियमितपणे नामस्मरण आणि संतसाहित्याशी जोडले गेले. हैबतराव बाबा आरफळकर यांच्या सूचनेनुसार श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडीसमवेत सहभाग घेण्यात आला. सध्या पालखी रथापुढे दिंडी क्रमांक सहा ही ‘जळगावकर’ या नावाने चालत असून, ही दिंडी वारकरी संप्रदायातील मानाच्या दिंड्यांपैकी एक मानली जाते.