आहाराच्या अयोग्य सवयींना आपलेसे केल्यानेच प्रकृतीची हेळसांड होत असल्याने आता पोषण आहार तज्ज्ञ म्हणजेच न्युट्रिशनिस्ट्ससाठी चांगल्या करिअर संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. एकीकडे अयोग्य आहाराच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी योग्य आहाराकडे वळणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
डॉक्टरमंडळीही योग्य आहार नियोजनासाठी रुग्णांना बरेचदा न्युट्रिशनिस्टकडे पाठवतात. मोठ्या रुग्णालयांमध्ये इतर स्पेशलाइज्ड डॉक्टरांबरोबर न्युट्रिशनिस्टची सेवा उपलब्ध करून दिली जाते. विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवतात. त्यांचा दररोज खास ‘डाएट प्लॅन’ असतो. त्यांना अशी सेवा न्युट्रिशनिस्ट पुरवतात.