चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रांसाठी उत्कृष्ट शिक्षण व प्रशिक्षण देणारी फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही आपल्या देशातील या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची संस्था. या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेतून गेल्या अनेक वर्षांत एकापेक्षा एक गुणवंत बाहेर पडले आहेत. या सर्वांनी भारतीय चित्रपट व टीव्ही या माध्यमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
या संस्थेने टीव्ही, चित्रपट, ॲनिमेशन, व्हीएफक्स या क्षेत्रासाठी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम या क्षेत्रातील नामवंत व यशस्वी व्यक्ती शिकवतात. सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. संस्थेकडे अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज स्टुडिओ आहे.