हॉस्पिटॅलिटी उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालायामार्फत दिल्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग ॲण्ड न्युट्रिशन ही संस्था १९६२मध्ये स्थापन करण्यात आली. गेल्या ६३ वर्षांत या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
या संस्थेतून देशातील नामवंत शेफ, आहार तज्ज्ञ, हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी लागणारे तज्ज्ञ तयार झाले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जा यांमुळेच या संस्थेला हे यश मिळू शकले.
या संस्थेत सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीत होतो. संस्थेत सैद्धांतिक ज्ञानावर अधिक भर दिला जात नाही. विद्यार्थ्यांनी पुस्तकी किडा होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना प्रयोगशीलतेचे अधिकाधिक धडे दिले जातात. हे धडे त्यांनी स्वतःहूनच गिरवावेत याकडे लक्ष पुरवले जाते. विद्यार्थ्यांना नामवंत हॉटेल, रेस्टॉरंट व अशाच प्रकारच्या संस्थांमध्ये इंटर्नशिप मिळावी व त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.