गेल्या काही वर्षांत जगभरात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्यामुळे या व्यवसायाचे रूपांतर एका विशाल उद्योगात झाले आहे. या क्षेत्राला मोठ्या संख्येने तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीएम) या संस्थेची स्थापना केली.
ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. पर्यटन, प्रवास आणि संबंधित क्षेत्रांत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील ही आघाडीची संस्था आहे. १९८३मध्ये दिल्ली येथे संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या संस्थेने ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा आणि नेल्लोर याठिकाणी कॅम्पस सुरू केले.
या संस्थेने पर्यटन व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमात स्वतःचे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर झालेल्या सर्व बदलांचा अंगीकार करून जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम तयार केला आहे.