डॉ. सत्यजित चिंचोलकर
समाज काय म्हणतो, शेजारचा चिंटू किती टक्के मिळवतो, या गोष्टींना फारसा अर्थ नाही. आजपासून दहा वर्षांनंतर कोणीही तुम्हाला विचारणार नाही, की तुम्हाला सातवीत किती टक्के मिळाले होते वगैरे. पण तुमचं काम तुम्ही कशा पद्धतीनं करता, तुम्ही सर्जनशील आहात का, आत्मपरीक्षण करता का, नवे विचार करता का, हे तुमच्या प्रगतीसाठी कायम महत्त्वाचं ठरेल!
विजय आणि अजय शाळेतले दोन मित्र. एकाच वर्गात शिकलेले, एकाच वयाचे, पण त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी मात्र पूर्णपणे वेगळी. विजयच्या घरात लहानपणापासूनच एक गोष्ट पक्की शिकवली गेली - टक्के मिळव, रँक घे आणि सर्वांच्या पुढे राहा. त्याच्या आई-वडिलांच्या दृष्टीनं शिक्षणातील यश म्हणजे गुण आणि टक्के.
विजयनं त्यांच्या इच्छेनुसार लहानपणीचा बहुतांश वेळ टक्के, स्पर्धा यांमध्ये घालवला. चांगले टक्के नाही मिळाले, तर चांगल्या कॉलेजला प्रवेश नाही, मग चांगली नोकरी कशी मिळणार? कमी मार्क्स मिळाले तर शेजारी काय म्हणतील? मित्राला जास्त टक्के मिळाले, तर त्याचं नाक आणखी उंच होईल! कारणं अनेक होती... पण शेवटी जे होणार होतं तेच झालं -