बॉन्ड गर्ल्स । प्रसाद नामजोशी
कॅरोलनं मेलिना हॅवलॉक या धाडसी, बुद्धिमान आणि सुंदर बॉन्ड गर्लची भूमिका साकारली. बॉन्ड गर्लच्या यशानंतर कॅरोलनं फक्त ग्लॅमरस किंवा व्यावसायिक चित्रपटांमधल्या भूमिकांपुरतं मर्यादित न राहता विविध प्रकारच्या कलात्मक चित्रपटांमधल्या भूमिका स्वीकारल्या. कान्ससारख्या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणूनही तिची निवड झाली होती.
एकेकाळी गाजलेला बॉन्डपट फॉर युवर आईज ओन्ली हा मूळ एका टीव्ही मालिकेसाठी लिहिलेला एपिसोड होता हे आज सांगितलं तर विश्वास बसणार नाही! पण इऑन फ्लेमिंगनं टीव्ही मालिका करायची म्हणून १९५८मध्येच जेम्स बॉन्डचा हा एक एपिसोड लिहून ठेवला होता. टीव्ही मालिका तर झाली नाही, पण नंतर त्यावर चित्रपट करावा असं ठरलं, तेव्हा आणखीन वीस वर्षं निघून गेली होती.
खरंतर फॉर युवर आईज ओन्लीचा नंबर द स्पाय हू लव्ह्ड मी या १९७७च्या बॉन्डपटानंतर यायचा. मात्र त्याच वेळी सायन्स फिक्शन चित्रपटांची एक मोठी लाट आली होती. स्टार वॉर्स हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता आणि म्हणून मूनरेकर हा नवा बॉन्डपट करायचा ठरला. त्यामुळे साहजिकच फॉर युवर आईज ओन्ली मागे पडला.