

Contemporary Marathi literature and lifestyle stories
esakal
या मालिकेतल्या कथा आहेत म्हटल्या तर स्वतंत्र, म्हटल्या तर जोडलेल्या. तशा अगदी वेगळ्या... पण त्यांना जोडणारा असेल एक अदृश्य धागा. तुमच्या-आमच्या भोवतालातल्या, जवळच्या वाटतील, भावतील अशा कथांचे हे नवे सदर... भ्रमरकथा!
भर दुपारी गर्दीत प्रवास करून इथं यायची खरंच गरज होती का? असा प्रश्न त्या कॅफेच्या दारात उभं राहून कविता स्वतःलाच विचारत होती. गाडीला पार्किंग पटकन मिळेना, तेव्हा तिला एका ठिकाणी एक-दोन गाड्या लावलेल्या दिसल्या. तिने तिची गाडी एकाला सोबत दोघांची म्हणत तिथं लावली. चालत चालत कॅफेच्या दारात पोहोचल्यावर उगाचच तिला हिंदी चित्रपट, मालिकांमधल्या फ्रीज होणाऱ्या कॅमेऱ्याची आठवण झाली. क्या किया तुमने, तुमसे ये उम्मीद नही थी, असं स्वतःलाच ऐकवत आणि मग आजूबाजूला बघत तिनं पुढचं पाऊल उचललं. आता हे उचललेलं पाऊल मागं घ्यायचं नाही असं म्हणत तिनं समोर असलेल्या चकचकीत कॅफेचं दार उघडलं आणि आतल्या गार झुळकीनं तिचा जीव सुखावला. आजवर अशा ठिकाणी जाणाऱ्या लोकांना़ ‘काय पन्नास रुपयांची कॉफी प्यायला पाचशे द्यायचे, चोचले नुसते,’ अशी ठेवणीतली आणि कित्येकदा वापरलेली वाक्यं आज मनातल्या मनात ती स्वतःवरच सोडणार होती.