Bird Photography : पक्ष्याचे सौंदर्य खरोखरच अलौकिक होते!

ज्यांच्या शोधार्थ आलो होतो ते पक्षी आम्हाला दिसले आणि त्यांना आम्ही कॅमेऱ्यात छानपैकी टिपू शकलो.
bird
birdesakal

विशिष्ट पक्षी बघण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जाणे आणि तो पक्षी बघावयास मिळणे ह्यात थोडा नशिबाचा भाग असतोच आणि त्या दृष्टीने आम्ही नशीबवान ठरलो, कारण ज्यांच्या शोधार्थ आलो होतो ते पक्षी आम्हाला दिसले आणि त्यांना आम्ही कॅमेऱ्यात छानपैकी टिपू शकलो.

शेखर ओढेकर

उत्तराखंड म्हणजे देवभूमी. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, ऋषिकेश यांसारख्या पवित्र स्थळांची भूमी.

पण त्याचबरोबर विशाल पर्वतरांगा, बर्फाच्छादित पर्वत शिखरे, दऱ्या, खळाळून वाहणारे झरे, असंख्य तलाव, डोंगर उतारावरची वृक्षराजी, विविध प्रकारची जंगले आणि अशा या निसर्गाचा वरदहस्त असलेल्या भवतालात मुक्तपणे विहार करणारे प्राणी आणि पक्षी!

त्यामुळे उत्तराखंडमध्ये पक्षी निरीक्षणाचा बेत आखल्यानंतर एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. कारण यावेळी ठिकाणांची संख्या जास्त असल्याने टूरची व्याप्ती मोठी होती.

प्रवासाची सुरुवात नाशिक दिल्ली प्रवासाने झाली. दिल्लीत पोहोचल्यावर काठगोदामसाठीची दुसरी ट्रेन नऊ तासांनंतर होती. तीही नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा आली. रात्री नऊ वाजता ट्रेनमध्ये बसून पहाटे पाचच्या दरम्यान आम्ही काठगोदामला उतरलो.

स्टेशन ते हॉटेल साधारण वीस-बावीस किलोमीटर अंतर होते. पहाटेच्या अंधुकशा प्रकाशात परिसराचा विशेष अंदाज येत नव्हता, पण गाडी सगळी चढणे चढत घाट रस्त्यावरून वर जात आहे एवढेच समजत होते.

अखेरीस निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल बघितले आणि मनाला तजेला आला. हे हॉटेल फक्त पक्षी निरीक्षकांसाठीच असावे असे वाटले, कारण हॉटेलची अंतर्गत रचना, सजावट, रूमची रचना या सर्व ठिकाणी उत्तराखंड भागातील विविध पक्ष्यांचे फोटो, पेंटिंग, छोट्या प्रतिकृती यांचा प्रामुख्याने समावेश होता.

हॉटेल मॅनेजर स्वतः एक पक्षी निरीक्षक होते. त्यांना पक्ष्यांची खूपच माहिती आहे, हे त्यांच्याशी बोलताना लक्षात येत होते. त्यांनी आम्हाला आमच्या गाइडसोबत हॉटेलचा पूर्ण परिसर दाखविला.

यलो थ्रोटेड मार्टेन
यलो थ्रोटेड मार्टेनesakal

गाइडबरोबर दिवसाचे पक्षी निरीक्षण कुठे आणि कसे करायचे याबाबत चर्चा केली. गाइडने सांगितले, आज आपण कुठेही बाहेर जाणार नसून आपले पक्षी निरीक्षण हॉटेल परिसरातच आहे. हाइड बर्ड वॉचिंग आणि फोटोग्राफी!

साधारण अडीच-तीन एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत असलेल्या ह्या हॉटेलच्या एका बाजूला हाइड तयार करण्यात आले होते. तो भाग जवळपास सर्व बाजूंनी वृक्षराजींनी वेढलेला होता. हॉटेल एका टेकडीवरच असल्याने झाडांच्या मागील बाजूला दरीच असल्यासारखे वाटत होते.

हॉटेलचा हा भाग जंगल सदृश असल्याने तेथे निरनिराळ्या पक्ष्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे तिथल्या काही भागांत हॉटेलने पक्ष्यांसाठी मोठी व्यवस्था केली होती. दोन-तीन ठिकाणी पाण्याची उथळ हौदासारखी व्यवस्था होती.

तसेच काही विशिष्ट प्रकारचे खाद्य (अर्थात जंगलातलेच) टाकले होते. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची हालचाल होती. ह्या सर्व सुंदर पक्ष्यांचे निरीक्षण, त्यांची फोटोग्राफी, त्यांचा अभ्यास शक्य तितक्या जवळून करता यावा या उद्देशाने तिथे एक हाइड (Hide) तयार करण्यात आले होते. हिरव्या नेटने ते आच्छादले होते. आतमध्ये आठ-दहाजण उभे राहू शकतील एवढी जागा होती.

हाइडचा वरचा खिडकीसारखा भाग कॅमेऱ्यांसाठी मोकळा ठेवला होता. कॅमेऱ्यांसाठी सपोर्ट म्हणून एक लांबलचक फळीदेखील बसवलेली होती. ट्रायपॉड वापरणारेदेखील आतून फोटोग्राफी करू शकत होते. हे एक प्रकारचे कॅमॉफ्लॉजिंग होते.

या व्यवस्थेमुळे पक्षी निरीक्षण बऱ्यापैकी जवळून करता येत असले, तरी पक्ष्यांच्या कुठल्याही हालचालींवर त्याचा परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात होती. हाइडबद्दल माहिती असली तरी त्यामधून फोटोग्राफी करण्याचा पहिलाच अनुभव होता.

हाइडमधून आम्ही परिसराचे निरीक्षण करत होतो. पक्ष्यांचे आवाज तर येत होते, पण हालचाली कुठे नजरेस पडत नव्हत्या. प्रतिक्षेत काही काळ असाच गेला आणि अचानक एक ऑलिव्ह ग्रीन रंगाचा आणि पिवळी मान असलेला सुतार पक्षी जवळच्या एका झाडावर दिसला.

तो ग्रेटर यलोनेप (थोडक्यात मानेवर पिवळे केस असलेला सुतार पक्षी) एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होता. थोड्याच वेळात बऱ्यापैकी जवळ असलेल्या एका झाडावर त्याचे पेकिंग म्हणजे झाडाच्या बुंध्यावर चोचीने आघात करून झाडातील किडे, अळ्या असे खाद्य शोधण्याचे काम सुरू झाले.

आम्ही प्रथमच ह्या सुतार पक्ष्याला बघत असल्याने जास्तीतजास्त फोटो काढले. हिमालय परिसरातील पहिलाच एक वेगळा सुंदर पक्षी बघितल्याचा आनंद झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ ही भावना दिसत होती.

कारणही तसेच होते, पक्ष्याचे सौंदर्य खरोखरच अलौकिक होते! तो झाडावर काही काळ स्थिरावल्यामुळे त्याचे सौंदर्यदेखील नीटपणे न्याहाळता आले.

काही वेळातच एका नवीन सुतार पक्ष्याचे आगमन झाले. हा आधीच्या सुतार पक्ष्यापेक्षा आकाराने थोडा मोठा होता. रंग जवळपास सारखाच म्हणजे ऑलिव्ह ग्रीन. पण डोके करड्या रंगाचे, पंखांना फिकट तांबूस कडा आणि त्यावर पांढऱ्या रेषा. डोके लालभडक आणि डोक्याच्या मागील बाजूस शेंडीच्या आकाराचा काळा पट्टा.

हा होता ग्रे हेडेड वूडपेकर (राखी डोक्याचा सुतार)! एका फांदीच्या टोकावर शांतपणे बसला होता. त्यामुळे आमची मनसोक्त फोटोग्राफी झाली. तेवढ्यात पक्ष्यांचा मोठा किलकिलाट झाला आणि चिमणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे साधारण दहा-बारा पक्षी अचानक जमिनीवर आले. ते जमिनीवर खाद्य शोधत इकडेतिकडे उड्या मारत जात होते.

त्यांचा कर्कश्श आवाज चालूच होता. फिकट तांबूस रंगाचे, पांढऱ्या शुभ्र गळ्याचे हे व्हाइट थ्रोटेड लाफिंग थ्रश (पांढऱ्या गळ्याचे कस्तुर) होते. इथले हिमालयन पक्षी प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक) असल्याने आम्हाला प्रत्येक पक्षी नवीनच होता.

काही पक्ष्यांची माहिती होती, पण प्रत्यक्षात बघितले नव्हते. हे कस्तुर जसे अचानक आले तसेच ते अचानक उडूनही गेले. आता त्यांची जागा टोई पोपटांच्या (प्लम हेडेड पॅराकिट) थव्याने घेतली. वीस पंचवीस पोपट एकदम जमिनीवर उतरले. त्यांना बहुधा त्यांचे खाद्य मिळाले असावे. सगळेजण जमिनीवरील खाद्य खाण्यात दंग झाले होते.

पाच-दहा मिनिटांत सगळे पोपट उडूनही गेले. काही काळ शांततेत गेला, पण थोड्या वेळात एक तितरची जोडी समोरच्या टेकडीवरून चढून येताना दिसली. कोंबडीपेक्षा मोठ्या आकाराची, गोलमटोल असलेली ही जोडी शांतपणे आली, तिथे असलेले पाणी पिऊन एक फेरफटका मारून निघून गेली.

काही काळ आम्ही ब्रेक घेऊन हाइडच्या बाहेर आलो. पुन्हा जेव्हा आम्ही हाइडमध्ये आलो तेव्हा एकदम चार-पाच पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.

आमच्या गाइडने त्यांची नावेदेखील लगेचच आम्हाला सांगितली. या सर्व पक्ष्यांमध्ये आमचे लक्ष वेधून घेतले ते रेड बिल्ड ब्लू मॅगपाय (लाल चोचीचा निळा दयाळ) ह्या पक्ष्याने!

तो एका जागेवरून दुसऱ्या बाजूला उडाला तेव्हा त्याची लांबलचक शेपटी पतंगाच्या शेपटीप्रमाणे भासली आणि त्यानेच आमचे लक्ष वेधले. हा पक्षी साधारण कावळ्याच्या आकाराचा.

डोके व मान काळ्या रंगाची, पोट पांढरे, पंख फिकट निळ्या रंगाचे व त्यावर पांढऱ्या रेषा, निळ्या शेपटीच्या टोकाची पिसे मात्र पांढरी! त्यामुळे ती जास्तच आकर्षक दिसत होती. लांबलचक शेपटी हेच ह्याचे मुख्य आकर्षण.

त्यानेच त्याचे सौंदर्य जास्त खुलले होते. इतर पक्ष्यांमध्ये हिमालयन बुलबुल, हिरव्या पाठीचा रामगंगा, टिकेलचा कस्तुर, बाक चोच सातभाई अशी मंडळी दिसली. ही सर्व फोटोग्राफी संपवून आम्ही सेशन थांबवले.

bird
birdesakal

दुपारी चारच्या दरम्यान पुन्हा हाइडमध्ये हजर झालो तेव्हा जरा वेगळेच दृश्य दिसले. एक पांडासारखा प्राणी पाणी पिताना दिसला. इतरत्र शांतता होती. पक्ष्यांचे आवाजदेखील विशेष नव्हते. तेवढ्यात आमचा गाइड म्हणाला, ‘आप लोग लकी है! आप जो देख रहे है वो यलो थ्रोटेड मार्टेन है! ये हमेशा आता नहीं ।’ त्यानेच सांगितले की मार्टेन आल्यामुळे पक्षी उडून गेलेले दिसताहेत.

हा प्राणी एकंदरीत आकर्षक वाटला. तोंडाचा, गळ्याचा आणि पोटाचा भाग पांढरा, फिकट पिवळा. बाकी शरीर फिकट तांबूस आणि काळसर झुपकेदार शेपूट असा एकंदरीत त्या प्राण्याचा नूर होता. मिश्र आहारी म्हणजे अगदी फळांपासून तर छोटेछोटे साप, उंदीर, बेडूक, पक्ष्यांची पिल्ले असा ह्यांचा आहार आणि बरोबर साथीदार असतील तर मोठ्या आकाराच्या प्राणी-पक्ष्यांवरदेखील हल्ला करायची तयारी!

असा हा मार्टेन दिसायला सुंदर पण तितकाच हिंस्रदेखील! त्यामुळेच पक्ष्यांना ह्याची भीती, गाइड आमच्या ज्ञानात भर घालत होता. त्याचेही आम्ही बरेच फोटो काढले. तो निघून गेल्यावर बराच वेळ शांतता होती. पक्ष्यांचे अस्तित्व कुठेच दिसत नव्हते. थोड्या वेळाने एक सुंदर सुतार पक्षी एका झाडावर अलगद येऊन बसला.

झाडाच्या खोडाच्या एका भागावर बसून त्याने चोचीने खाद्य शोधायला सुरुवात केली. खोडावर चोच आपटून खोडातील किडे, अळ्या यांचा शोध सुरू झाला. हा ब्राऊन ब्रेस्टेड वूडपेकर (तांबूस छातीचा सुतार) होता.

डोक्यावर लाल आणि पिवळा रंग, छाती व पोट तांबूस आणि त्यावर खवल्यांची नक्षी, काळ्या पंखांवर बारीक पांढरे पट्टे, लालसर पृष्ठभाग असा हा सुंदर पक्षी! त्याच्या छबी आम्ही मनमुरादपणे कॅमेऱ्यात कैद केल्या.

काही वेळानंतर अंतराने राखी रंगाचा टकेचोर, काळ्या तुऱ्याचा पिवळा रामगंगा, ब्लॅक बर्ड, खवलेदार होला, ठिपकेवाला होला, लाल पंखी होला, पाचू होला हे कबुतरांचे विविध प्रकार बघावयास मिळाले.

एकंदरीत पहिल्याच दिवशी एवढे विविध प्रकारचे पक्षी बघितल्याने आम्ही खरोखरच तृप्त झालो आणि हॉटेल रूमवर निघालो. नंतर गाइडबरोबर चर्चा करताना असे लक्षात आले, की आम्ही पहिल्याच दिवशी पंधरा नवीन पक्ष्यांच्या प्रजाती बघितल्या होत्या.

साहजिकच गाइडने त्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये, सवयी व इतर बरीच माहिती सांगितली.

दुसऱ्या दिवशी फोटोग्राफी, पक्षी निरीक्षणाचे ठिकाण वेगळे होते. सकाळी साडेसहा वाजता आम्ही तयार झालो. ड्रायव्हर, गाडी, गाइड सर्वजण अगदी वेळेवर हजर असल्याने आम्ही ताबडतोब बाहेर पडलो.

एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर रांगा अशा रस्त्यावरून आमची गाडी चालली होती. काही अंतर गेल्यानंतर आम्ही गाडी थांबून पायी चालणे पसंत केले. चालत चालतच आम्ही तिथल्या निसर्गाचा आनंद घेत होतो.

असेच जात असताना मला अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर नारिंगी गोमेट बसलेला दिसला. त्याच्या त्या लालसर रंगामुळे आणि तो एकदम फांदीच्या काठावर असल्याने त्याने एकदम लक्ष वेधले.

काळसर निळ्या रंगाचे तोंड व बाकी शरीर लालसर नारिंगी रंगाचे! पानांच्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर तो लाल रंग एकदम लक्ष वेधून घेत होता.

रस्त्यावर एकदम शांतता असल्याने आम्ही त्याचे छान फोटो काढू शकलो. त्यानंतर तो लगेच उडून गेला, जसे काही तो फोटोसाठी आमचीच वाट बघत होता.

bird
birdesakal
bird
Flamingo Birds : युरोप-रशियातून हजारो किलोमीटरचा पल्ला पार करत फ्लेमिंगो पक्ष्यांचं वाशिष्ठी किनारी आगमन

त्यानंतर काही अंतर परत कारने जाऊन आम्ही एका विशिष्ट ठिकाणी गाडी थांबवून परत पायी चालायला सुरुवात केली. त्या ठिकाणी झाडावरचे पक्षी मोठ्या प्रमाणावर असल्याने आमच्याखेरीज आणखी एक-दोन ग्रुप तिथे फोटोग्राफीसाठी होते.

त्या भागात पक्ष्यांचे आवाज बरेच येत होते, पण पक्षी पटकन नजरेस पडत नव्हते. काही पक्षी आकाराने लहान असल्याने सहजपणे दिसतदेखील नव्हते. एखादा पक्षी नजरेस पडला की सगळ्यांचे कॅमेरे त्या दिशेने जात आणि प्रत्येकजण फोटोसाठी धडपड करे.

ज्याने त्या पक्ष्याला कॅमेऱ्यात व्यवस्थित टिपले असेल त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसायचे आणि ज्याची संधी हुकली तो बिचारा नाराज!

आम्हाला या भागात बरेचशे वेगळे पक्षी बघायला मिळाले. त्यात प्रामुख्याने रुफस सेबीआ, गोमेटची मादी, खवल्यांचा कस्तुर हे होते.

आम्ही असेच पायी चालत बरेच अंतर पार केले. आजूबाजूच्या डोंगर दऱ्या, सभोवतालची वृक्षराजी आणि वातावरणातील शांतता या सर्व गोष्टींनी अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. या सर्वांचा आनंद घेत आमची भटकंती चालू होती.

वाटेत निसर्गाचे काही वेगळेपण लक्षात आले तर आम्ही ते कॅमेऱ्यात टिपत होतो. काही वेळाने गाइडने आम्हाला दोन वेगळे पक्षी बघायचे आहेत आणि आपण गाडीने सरळ त्या ठिकाणी जाऊ असे सांगितले. ते अंतर पाच सहा किलोमीटर होते.

त्या ठिकाणाचे नाव होते चाफी. ते एक छोटेसे गाव होते. तिथे पोहोचल्यावर आम्ही पायीच फिरायला सुरुवात केली. मुख्य रस्त्याच्या बाजूला खाली उतरल्यावर तिथे झरे वाहत होते. पाणी मात्र खूपच कमी दिसत होते. बराचसा भाग कोरडाच होता.

तिथे फिरत असताना दगडांवर एक छोटासा व्हाईट हेडेड रिव्हर ब्लॅक स्टार्ट हा पक्षी दिसला. त्याचे एका दगडावरून दुसऱ्या दगडावर असे सारखे उड्या मारणे चालले होते. हादेखील हिमालयन पक्षी. त्याचे फोटो काढून आम्ही पुढे जात असताना आमच्या गाइडला हवा असलेला स्पॉटेड फोर्क टेल दिसला.

हे दोन पक्षी काही अंतरावर बसलेले होते. खरे म्हणजे हा पक्षी तसा रुबाबदार, दिसायला सुंदर आणि आकर्षक! पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा, छान काळी पांढरी लांब पण शेवटी दुभाजलेली अशी शेपटी असलेला असा हा पक्षी! त्या बसलेल्या पक्ष्यांच्या तशा हालचाली विशिष्ट नव्हत्या. ते दोन्ही पक्षी तंद्री लावूनच बसले होते.

शरीरावर असलेले काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे वेगवेगळे ठिपके, काळे डोके एकंदरीत छान दिसत होते. आम्हाला फोटो काढायला काही अडचण आली नाही. त्यानंतर आम्ही तसेच पुढे गेलो.

bird
birdesakal

तो भाग म्हणजे विस्तीर्ण झरा असावा. त्या झऱ्याला बऱ्याच भागात पाणी नव्हते, पण एका लांब कोपऱ्यात बरेच पाणी दिसत होते. तो सगळा परिसर प्रचंड मोठमोठ्या शिळा, दगड ह्यांनी व्यापला होता. मुख्य रस्त्यापासून आत जाणेसुद्धा जरा अवघडच होते.

पण क्रेस्टेड किंगफिशर फक्त ह्याच भागात दिसतात, हे माहीत असल्याने गाइडने आम्हाला मध्यभागी एका शिळेवर बसवले आणि तो किंगफिशरच्या शोधात निघाला. दगड, पाणी, ओहोळ असे अडथळे पार करत आमचा गाइड एका कोपऱ्यात लांबवर गेला. काही वेळाने त्याने आम्हाला खूण करून तेथे बोलावून घेतले.

वाटेत काही ठिकाणी वाहते पाणी, आधारासाठी दगडदेखील नाही... असे रस्तेदेखील होते. शक्य होईल तेवढे पाण्यातून दगडांचा कसातरी आधार घेत आम्ही पुढे गेलो. आम्ही थांबलो तिथे आमचा गाइडदेखील आला आणि त्याने आम्हाला त्या झऱ्याच्या काठावर असलेले दोन क्रेस्टेड किंगफिशर दाखवले. सुरुवातीला दोघेही झऱ्याच्या काठावर असलेल्या झाडावर होते. थोड्याच वेळात एक किंगफिशर खाली खडकावर येऊन बसला.

त्याचे पूर्ण लक्ष झऱ्याच्या वाहत्या पाण्याकडे होते. आमच्या समोर त्याने किमान तीन-चार वेळा तरी पाण्यात सूर मारून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात तो एकदा यशस्वी होताना दिसला. प्रत्येक वेळी पाण्यातून बाहेर आल्यावर तो डोके आणि अंग झटकून अंगावरचे पाणी काढून टाकत होता.

त्यावेळी त्याच्या डोक्यावरील तुऱ्यासारखे केस ज्या पद्धतीने हालायचे ते दृश्य खूपच सुंदर दिसत होते. त्याचवेळी अंगावरील पाण्याचे उडणारे थेंब उन्हामुळे खूपच वेधक वाटत होते. हा किंगफिशर खरे म्हणजे पाईड किंगफिशरसारखाच आहे.

काळा आणि पांढरा रंग असलेला, मासे हेच खाद्य असलेला पण आकाराने मोठा म्हणजे साधारण दीड फूट लांबीचा. थंडीच्या दिवसांत कमी उंचीच्या ठिकाणी येणारा हा स्थानिक स्थलांतर करणारा किंगफिशर.

विशिष्ट पक्षी बघण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जाणे आणि तो पक्षी बघावयास मिळणे ह्यात थोडा नशिबाचा भाग असतोच आणि त्या दृष्टीने आम्ही नशीबवान ठरलो, कारण ज्यांच्या शोधार्थ आलो होतो ते पक्षी आम्हाला दिसले आणि त्यांना आम्ही कॅमेऱ्यात छानपैकी टिपू शकलो. या आमच्या यशस्वी प्रयत्नानंतर आम्ही सरळ हॉटेलकडे प्रयाण केले.

bird
Rare Birds: कान्हा अभयारण्यात पिवळ्या पायांच्या बटन लावाचे पहिले छायाचित्रे! सर्वेक्षणात आढळला पक्षी

काही काळ विश्रांती घेऊन दुपारची फोटोग्राफी हाइडमधूनच करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे हाइडमध्ये आम्ही जरा उशिराच आलो. आल्या आल्या आम्हाला जरा पक्ष्यांची लगबग दिसली. एकाच वेळी प्रथमच जास्त पक्षी नजरेस पडले.

एका कोपऱ्यात काही छोटे छोटे पक्षी पाण्यात अंघोळ करत होते. त्यामध्ये रेड बिल्ड लिथ्रीक्स पक्षी नवीनच दिसला. अतिशय सुंदर असा विविध रंगांनी सजलेला असा हा पक्षी! आकाराने साधारण चिमणी एवढाच. लालचुटूक चोच, डोके गडद तांबूस रंगाचे, गळ्याचा रंग पिवळा, अंग तांबूस आणि करड्या रंगाचे, शेपटी फिकट नारिंगी आणि करडी, तर शेपटीच्या टोकाची पिसे निळी जांभळी. पण खरे आकर्षक रंग होते पंखांवर.

पंखांच्या टोकांवर लाल, पिवळा, नारिंगी आणि करड्या रंगाच्या पट्ट्या होत्या. निसर्गाने केलेली रंगांची उधळणच! हे रंग बघून आम्ही अक्षरशः अवाक झालो. एकाच वेळी आठ-दहा पक्षी तरी तिथे दिसले. काही पाण्यात, काही झाडावर, काही जमिनीवर खाद्य शोधत होते. त्यामुळे आम्ही त्यांचे बरेच फोटो काढले.

ह्यांच्या जोडीला पाण्यात चसमिस, बुलबुल, सातभाई, हिरव्या पाठीचा रामगंगा हेदेखील होते. एकंदरीत ह्यावेळी पक्ष्यांच्या हालचाली जास्त दिसल्या. यामध्ये भर पडली एका अजून वेगळ्या पक्ष्याची. जवळच्या टेकडीवरून एक रुबाबदार पक्षी हळूहळू वर आला.

कोंबड्यापेक्षा आकाराने बराच मोठा, डोक्यावर पांढरा मोठा शेंडीवजा तुरा, डोळ्याभोवती लालचुटुक असा पॅच, मान निळ्या जांभळ्या रंगाची, अंगावरील पिसे पांढरी, जांभळी, निळी, थोडीशी काळसर, रंग अतिशय चमकदार, चोच पांढरी, पाय पांढरे आणि शेपटी म्हणजे पिसाराच! हा पक्षी होता कालीज फेझंट.

त्याच्या नुसत्या उभे राहण्याने काही पक्षी उडून गेले. त्याचा रुबाब एकंदरीत वेगळा वाटला. त्याच्याच मागे त्याची जोडीदारीणदेखील आली. तांबूस रंग, अंगावर खवल्यांची नक्षी, आकाराने थोडी लहान, डोळ्याभोवती लाल पॅच.

ही जोडी बराच वेळ मोकळ्या जागेत फिरत होती. ह्या जोडीचे बरेच फोटो काढल्यावर आम्ही हाइडच्या बाहेर पडलो आणि रिसॉर्टच्या एका बाजूला टेकडी असलेल्या भागात भटकंतीला गेलो.

bird
Indian Pitta Bird : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पावसाच्या आगमनाची 'नवरंग'नं दिली चाहूल

बराचसा भाग उंच सखल असा होता. त्या भागात झाडीझुडपे बरीच होती. तिथे पक्ष्यांचे आवाज खूप येत होते. आम्ही आमचे कॅमेरे सज्ज ठेवूनच फिरत होतो. तेवढ्यात आमच्या गाइडने एका झाडाकडे बोट दाखवले, ब्लॅक हेडेड जे! आम्ही बघत होतो.

साधारण कावळ्याच्या आकाराचा लांब शेपटी असलेला एक पक्षी दिसला. बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याच्या रंगाची किमया लक्षात आली. डोके पूर्ण काळेभोर, गळा निळसर काळा व त्यावर पांढऱ्या छोट्या छोट्या रेषा. अंगाचा रंग काहीसा करडा, बराचसा बदामी, पंखांवर काळे पांढरे पट्टे आणि सर्वात आकर्षक म्हणजे पंख्यांच्या कडा आणि लांबलचक शेपटी निळ्या रंगाची आणि त्यावर काळ्या पट्ट्या! ब्लॅक हेडेड जे खरोखरच छान दिसत होता.

हा पक्षी मिश्रआहारी आहे. छोटे छोटे किडे, पाली, बेडूक, पक्ष्यांची पिल्ले येथपासून तो अगदी बेरी आणि इतर फळेसुद्धा खातो. ह्याचे फोटो काढत असताना एका डबकेवजा पाण्यात ब्लू विंग मिनला अंघोळ करताना दिसला.

बदामी रंगाचे शरीर असलेला हा पक्षी सुंदर होता. तोंड व गळा पांढऱ्या रंगाचा, डोक्यावर निळ्या रंगाचा एक पट्टा, मान व पंखांचा काही भाग बदामी रंगाचा, पंखांचा टोकाकडचा भाग निळ्या रंगाचा व त्यावर पांढऱ्या पट्ट्या.

तसेच शेपटी निळसर रंगाची. असे हे विलोभनीय रूप होते! झाडावरील बारीक बारीक कीटक, फळे, बिया हेच ह्याचे अन्न. आम्ही त्या भागात जास्त न फिरता एकाच ठिकाणी बसून पक्षी निरीक्षण करायचे ठरवले.

त्यासाठी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ थांबून आम्हाला फक्त नारिंगी कस्तुरच दिसला. त्यामुळे आम्ही तिथला मुक्काम हलवला आणि सरळ हॉटेल गाठले.

पहिल्या मुक्कामातच आम्हाला अनेक रंगीबेरंगी पक्ष्यांची मांदियाळी दिसली होती. पण ही तर सुरुवात होती. अजून सातताल, भीमताल बाकी होते... तिथेही अनोखे काहीतरी दिसणार याची खात्री बाळगत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो!

----------------

bird
Bird Sanctuary : सुमारे २९ देशांतून दीडशेच्यावर प्रजातींचे विविध प्रकारचे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून भारतात येतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.