
डॉ. राधिका टिपरे
तसा यावर्षी पाऊस छान पडत होता. त्यामुळे सोनटक्क्यानं नाजूक साजूक, पांढऱ्याशुभ्र फुलांचा जणू रतीबच लावला होता. लांबलचक, कोवळ्या दिठीची, तलम पाकळ्या असलेली शुभ्र रंगाची इतकी फुलं रोज येत होती, की मन वेडं होऊन जायचं. एखाद्या फुलानं किती नाजूक असावं बरं?
अलीकडेच पुण्यातल्या एरंडवण्यातील नवीन घराला वरची गच्ची असल्यामुळे लहानमोठ्या कुंड्यांतून झाडं लावून लहानशी बाग फुलवली. इवली-इवली रोपं वाढायला लागली, तसं कोमेजल्या मनाला जणू नवचैतन्य मिळालं.
जसजशी माझी बाग फुलायला लागली, तसा मनाचा एकटेपणा कधी निघून गेला ते कळलंही नाही. आता पुन्हा एकदा माझ्या अंगणात ‘सग्यासोयऱ्यां’ची वर्दळ सुरू झालीय. रोज हे पाहुणे भेटताहेत. त्यामुळे जीवनाला जणू पूर्णत्व आल्यासारखं झालं आणि मनही रमायला लागलं.