

Blue Economy in India
esakal
प्राची गावस्कर
महासागर हे भारताच्या आर्थिक विकासाचे, पर्यावरणीय संतुलनाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत. नील अर्थव्यवस्थेमुळे भारताला रोजगार, व्यापार, ऊर्जा, पर्यटन आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. परंतु, या विकासासोबत सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे तितकेच आवश्यक आहे.
काही काळापासून ‘ब्लू इकॉनॉमी’ म्हणजेच ‘नील अर्थव्यवस्था’ ही संकल्पना सातत्याने आपल्या कानावर पडत आहे. मुंबईहून गोव्याला बोट सफारी सुरू किंवा अलिबागला रोरो बोट, जलवाहतुकीला सरकारचे प्रोत्साहन अशा बातम्या आपण ऐकत, वाचत असतो. मात्र, नेमकी ही नील अर्थव्यवस्था संकल्पना काय आहे, आपल्याला ती कशी वापरता येणार आहे, तिचा कसा फायदा होणार आहे असे अनेक प्रश्न पडतात. आपल्या देशाच्या प्रगतीत ही अर्थव्यवस्था मोलाचे योगदान देऊ शकते. त्यादृष्टीने या अर्थव्यवस्थेच्या व्यापक विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपल्या देशाला लाभलेला मोठा सागरी किनारा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला देश असून त्याला सुमारे ७,५०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे महासागर आर्थिक आणि सामरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. महासागर, समुद्रकिनारे, बेटे, सागरी जैवसंपत्ती आणि जलसंपत्ती यांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, व्यापार, ऊर्जा उत्पादन, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन साधणे हा नील अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे.