

Bollywood Actresses
esakal
भूमिका सावंत
पारंपरिक नायिकेच्या साच्यात न अडकता त्यांनी साकारलेल्या बहुआयामी व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यामुळे अभिनयकौशल्य व व्यक्तिरेखेची खोली यांनाही आता तितकंच महत्त्व मिळू लागलं आहे. मात्र हाच बदल मोठ्या पडद्यावरही दिसू लागला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांत आलेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास, पारंपरिक ग्लॅमरस अभिनेत्रींसोबतच आजवर सहाय्यक भूमिका किंवा ओटीटी माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकताना दिसत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हटलं, की सर्वप्रथम आठवतं ते झगमगतं ग्लॅमर! बॉलिवूडच्या या ग्लॅमरविश्वाचा मोठा भार अनेकदा अभिनेत्रींच्या खांद्यावरच असतो. प्रत्येक दशकात काही मोजक्या अभिनेत्री आपल्या सौंदर्यानं, अभिनयानं आणि पडद्यावरील करिष्म्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. तो काळ जणू त्यांच्या नावानंच ओळखला जाऊ लागतो. मात्र काळाच्या ओघात पिढ्या बदलतात, नव्या कथा येतात आणि नवे चेहरेही समोर येतात. एका पिढीनं जपलेला ग्लॅमरचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जातो आणि नव्या अभिनेत्री आपल्या व्यक्तिमत्त्वानं, शैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉलिवूडच्या नव्या पर्वाची ओळख ठरतात.