

Importance of Books in Life
esakal
ज्ञान, मनोरंजन आणि माहिती या तीन गोष्टी मिळवण्याचे माध्यम एकच असणे म्हणजे पुस्तक होय. पुस्तकाबरोबरची मैत्री जगातील सर्वांत महत्त्वाची आणि खऱ्या अर्थाने निरपेक्ष स्वरूपाची असते. पुस्तकांबरोबरचा संवाद खरेतर एकतर्फी असतो असा समज असतो. आपण पुस्तक वाचत असतो आणि त्या पुस्तकामधून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात. या संवादामध्ये प्रत्यक्ष माणूस समोर नसतो, पण पुस्तकाच्या रूपातून जे विश्व आपल्यासमोर उभे राहते त्याच्यात आपण हरवून जातो. एका अर्थी हा संवाद असतोही आणि नसतोही. आपण काय ग्रहण करतोय यावर हा संवाद अवलंबून असतो. काही शतकांपासून, म्हणजे थोडक्यात मुद्रणकलेच्या शोधापासून पुस्तके आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवणारी ठरली. त्यापूर्वी हस्तलिखित ग्रंथ आणि त्याही पूर्वी भूर्जपत्रांवर केलेल्या नोंदी हे पुस्तकांचे ज्ञात असलेले रूप. आपल्याबरोबर कुठेही सहजपणे बाळगता येईल असे पुस्तकांचे स्वरूप मुद्रणकलेच्या शोधानंतर पक्के झाले. पुस्तके मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतात यात शंका नाही. पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र तीनही घटकांमध्ये अस्सलता हा समान धागा आहे. संगणकाच्या युगात पुस्तकांचे स्वरूप बदलले, म्हणजे संगणकाच्या मदतीने पुस्तकाचे वाचन सुरू झाले. माहितीच्या विस्फोटाच्या सध्याच्या काळात टिकून राहिलेली गोष्ट म्हणजे पुस्तक होय.