

Braille Script History
esakal
स्वागत थोरात
ब्रेल लिपी ही केवळ ठिपक्यांची भाषा नाही, तर ती नेत्रहीन व्यक्तींच्या स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची भाषा आहे. जेव्हा एखादी नेत्रहीन व्यक्ती आपल्या बोटांनी अक्षरांना स्पर्श करते, तेव्हा तिला ज्ञानाची अनुभूती येते, जी केवळ ऐकून मिळत नाही. महाराष्ट्रातील समृद्ध मराठी साहित्य या लिपीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचत आहे. तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घातली, तर येणाऱ्या काळात ब्रेल साक्षरता अधिक व्यापक होईल आणि ‘ज्ञानाचा दिवा’ प्रत्येक बोटाच्या टोकावर प्रज्वलित होईल.
‘दिसणे’ आणि ‘वाचणे’ या दोन क्रिया मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, ज्यांना निसर्गतः दृष्टी लाभलेली नाही किंवा अपघाताने दृष्टी गेलेली आहे, त्यांच्यासाठी जगाची ज्ञान कवाडे उघडण्याचे काम ‘ब्रेल’ लिपीने केले आहे. डोळ्यांनी जग पाहता येत नसले, तरी बोटांच्या स्पर्शाने मात्र ज्ञानाचे आभाळ कवेत घेण्याची ताकद या सहा ठिपक्यांच्या लिपीत आहे. ज्ञान ग्रहण करण्यासाठी ब्रेल पुस्तकांची आवश्यकता कालही होती आणि आजही आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही ब्रेल लिपीचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट ती अधिक प्रगत झाली आहे. ब्रेल पुस्तकांबद्दल लिहितांना साहजिकच ब्रेल लिपीबद्दल थोडे लिहिले पाहिजे.