‘ब्रेन रॉट’हा शब्द माणसाच्या भाषेने पहिल्यांदा ऐकला त्याला आणखी पाच वर्षांनी पावणे दोनशे वर्षं होतील. दुसऱ्या सहस्रकाचं पहिलं शतक पंचविशीच्या उंबरठ्यावर असताना मेंदूच्या सडलेपणाची जाणीव करून देणाऱ्या या शब्दाची आठवण जगाला नव्यानं झालीय, ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या वर्ड ऑफ दी इयरमुळे.
ब्रेन रॉट हा शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा ‘या वर्षीचा’ शब्द आहे. सदतीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी आणि भाषातज्ज्ञांनी निवडलेला; तो फिरतो सुमार दर्जाच्या समाजमाध्यमी सामग्रीच्या अतिवापराच्या मानसिक परिणामांभोवती.