डॉ. अविनाश भोंडवे
नैराश्य हा सर्वत्र आढळणारा विकार असूनही त्याबाबत अनेक मिथके आणि गैरसमज आहेत. संशोधनातून मानसिक आजारांवर जसजशा नवनवीन संकल्पना, उपचार विकसित होत जातील, तसतसे त्या बद्दलच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय धारणा विकसित होत जातील आणि हे गैरसमज नाहीसे होतील.
भारतात नैराश्य हा मनोविकार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मानसिक विकारांनी पछाडलेल्या भारतीयांची संख्या २०१७ मध्ये १९.७१ कोटी होती, असे द लँसेट या जगद्विख्यात वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद केले आहे. त्यातील ४.५७ कोटी लोक नैराश्य विकाराने, तर ४.४९ कोटी चिंता विकाराने ग्रस्त होते.
भारतात १९९० मध्ये मानसिक विकारांचे एकूण रुग्ण लोकसंख्येच्या २.५ टक्के होते, तर २०१७मध्ये हेच प्रमाण ४.७ टक्क्यांपर्यंत वाढले. मानसिक विकारांची जाणीव नसणे, मनोविकारांवरील उपचाराची भीती आणि त्याची टाळाटाळ यामुळे काही रुग्णांची नोंदणी होत नाही. अशा नोंदणी न झालेल्या रुग्णांची संख्या यात मिळविल्यास हे प्रमाण कित्येक पट जास्त असू शकते. गेल्या आठ वर्षांत त्यात भर पडून हे प्रमाण नक्कीच वाढले असेल.