
नेहा कुलकर्णी
बदलत्या काळात लग्न समारंभ आणि त्यातली फॅशनही बदलत गेली आहे. प्री-वेडिंग ते रिसेप्शन असा प्रत्येक प्रसंग देखणा करणारी फॅशन निवडली जाते. लग्नाच्या इतर प्लॅनिंगबरोबरच आता सोहळ्याच्या थीमवर विचार केला जातो. लग्नासाठी काही थीम ठरवणं हे आता नवीन राहिलेलं नाही. यंदाचा वेडिंग सीझन फॅशन मंत्रा आहे तरी काय?
लगीनघाई म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची असते ती कपडे खरेदी. लग्नाचा बस्ता बांधणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. प्रत्येक लग्नघरात दिसणारं दृश्य... नवरी मुलगी किंवा मुलगा, एखादी मैत्रीण/मित्र, आई-वडील, बहीण-भाऊ, वहिनी, एखादा चुलत-मावस भाऊ, मावशा, आत्या अशा सगळ्या नातेवाइकांना सोयीची एक तारीख काढायची आणि एखाद्या नामवंत दुकानात बस्ता बांधण्यासाठी जाऊन पोहोचायचं.
नवऱ्या मुलीची खरेदी असेल तर किमान पाच साड्या तरी ठरलेल्या. हळदीची, तेलाची, पाठवणीची अशा पारंपरिक साड्या आणि शालूची किंवा पैठणीची खरेदी होता होता दिवस संपतो. मग नव्या नवरीकडे असाव्यात ‘आणखी चार’ म्हणत त्या चार साड्यांचीही भर पडते.
छानशा कोऱ्या पांढऱ्या कापडावर कुंकवाचं स्वस्तिक रेखाटून त्यात या साऱ्या रेशमी साड्यांच्या घड्या बांधायच्या, अर्थात बस्ता बांधायचा. मग जवळच्या नातेवाइकांच्या देण्याघेण्याच्या साड्या आपापल्या बजेटनुसार खरेदी करायच्या.
नवरीचा बस्ता मैत्रिणी, जवळच्या नातेवाइकांनी बघायला जाणं, तो दाखवणं हाही एक छान ‘पोट-उपक्रम’ लग्नापर्यंत चालत राहतो. त्यामानानं नवऱ्या मुलाची खरेदी तशी थोडक्यात आटपते. तिकडे खरेदीत वरमाई आणि करवल्यांचाच नखरा जास्त.