

California Travel and Natural Beauty
esakal
डॉ. राधिका टिपरे
सगळ्यात सुंदर आहे तो प्रशांत महासागराचा अत्यंत निसर्गरम्य किनारा. या संपूर्ण समुद्रकिनाऱ्याला समांतर अशी कोस्टल माउंटन रेंज या नावानं ओळखली जाणारी पर्वतमाला आहे. तिच्या अंगाखांद्यावर वाढलेलं रेडवूडचं अफाट, घनदाट जंगल, किनाऱ्याच्या काठानं सळसळत जाणारा रस्ता किनाऱ्याच्या सौंदर्यात भर घालतो. किनाऱ्याच्या काठानं, रेडवूडच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या या कोस्टल रोडवरून प्रवास करणं एक सुंदर अनुभव होता. हा रस्ता म्हणजे अमेरिकी माणसानं निसर्गाला कवेत घेऊन निर्माण केलेलं अप्रतिम शिल्पच!
कन्या अमेरिकेत राहत असल्यामुळे वर्षातून एखादी चक्कर माझी अमेरिकेत होतेच. ती राहते तो भाग पाहिला जातो. मुळातच अमेरिका देश इतका मोठा आहे, की संपूर्ण देश पाहणं या जन्मी तरी शक्य नाही. शिवाय पदरमोड करून अमेरिकेत फिरायला जाणं मध्यमवर्गीय भारतीयांसाठी अवघडच असू शकतं. आता तर ते दुष्प्राप्यच झालंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एका डॉलरला शंभर रुपये देऊन या देशात भटकंती करणंं आणि राहणं कसं परवडणार? इकडे आल्यावर एकट्यानं फारसं कुठे जाता येत नाही. मुलांनी कुठे नेलं तरच बाहेरचं जग दिसणार. असो, यावेळी मात्र कन्येनं आम्हाला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅनफ्रॅन्सिस्को या गावी घेऊन जायचं असं आधीच ठरवलं होतं. तिथे तिची नणंद आरती राहत असल्यामुळे तो भाग बघायला जाणं सोयीचं होणार होतं. ठरल्याप्रमाणे आम्ही सॅनफ्रॅन्सिस्कोच्या फ्रिमाँट उपनगरातील आरतीच्या घरी पोहोचलो. तसं कॅलिफोर्निया हे नाव आपल्या इतकं ओळखीचं आहे, की जणू आपलं पुणं किंवा साताराच! त्यात काही वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा कॅलिफोर्निया करायचा’ अशा महाराष्ट्र शासनाच्या वल्गना सुरू होत्या. त्यामुळे तर कॅलिफोर्निया म्हणजे जणू आपलं तारकर्ली, सावंतवाडीच की काय, असं मनातून वाटत होतं. अमेरिकेतील शहरांची, गावांची, खेडेगावांची भव्यता, आखीवरेखीवपणा, भरगच्च हिरवाई, देखण्या इमारती, भव्य आठपदरी रस्ते, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा सगळंच तोंडात बोटं घालण्यासारखं होतं. मनातून अमेरिकेला कितीही शिव्याशाप द्यावेसे वाटत असले, तरी अमेरिकेच्या या गोष्टी नाकारून चालत नाही.
तर... ठरवलेल्या दिवशी आम्ही आरतीच्या सुंदर घरी पोहोचलो. इथली सर्व शहरं एकसारखीच वाटतात हेही तितकंच खरं. घरंही साधारणपणे सारखीच असतात. त्यात फारसं वेगळेपण नसतं. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य. सर्वांत सुंदर आणि सर्वांत श्रीमंत, तसंच निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं अतिशय निसर्गरम्य राज्य. या राज्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातही लॉस एंजेलिस हे सर्वात दाट लोकवस्तीचं, अतिश्रीमंतांचं जगप्रसिद्ध शहरही याच राज्यात आहे. त्यामुळे ‘कॅलिफोर्निया नही देखा, तो क्या देखा’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असून, अलास्का आणि टेक्सासनंतरचं आकारानं तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला अथांग प्रशांत (पॅसिफिक) महासागर पसरलेला असून उत्तरेस ओरेगॉन, पूर्वेस नेव्हाडा आणि अॅरिझोना राज्ये आहेत. दक्षिणेस मेक्सिकाची सीमा आहे. कधीकाळी मेक्सिकोचा भाग असलेलं कॅलिफोर्निया १८४८ सालच्या मेक्सिको-अमेरिका लढाईनंतर अमेरिकेत सामावलं गेलं आणि १८५०मध्ये अमेरिकेचं एकतिसावं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आकारानं प्रचंड असलेलं कॅलिफोर्निया निसर्गदत्त सौंदर्यानं नटलेलं तर आहेच, पण जगात कुठेही पाहायला मिळणार नाही इतकं वैचित्र्य आणि वैविध्य इथं पाहायला मिळतं. अमेरिकेच्या चारशे वर्षांच्या इतिहासात कॅलिफोर्निया राज्याला बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान आहे. आजच्या घडीला कॅलिफोर्निया अमेरिकेतील सर्वात श्रीमंत राज्य असून ते अनेक जगप्रसिद्ध कंपन्याचं माहेरघर आहे. शिवाय ‘सिलिकॉन व्हॅली’ नावानं ओळखलं जाणारं, आयटी कंपन्यांचं हब असलेलं सॅनफ्रॅन्सिस्को हे कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात महत्त्वाचं शहर आहे.