

Extreme Cold Weather
esakal
वैष्णवी संभूस
गोंडोलातला वेळ कसा गेला ते कळलंही नाही. आम्ही उतरलो ते उंच पर्वताच्या सर्वोच्च भागावर. तिथं जेमतेम पाचेक फुटांवरचंच दिसत होतं. धुक्याची लाटच होती जणू... तोंडातून आणि नाकातून प्रत्येक श्वासाबरोबर वाफा येत होत्या. आमच्या आजूबाजूचे सर्वजण आपली स्कीइंगची साधनं सज्ज करून, डोळ्यांवर गॉगल घालून स्कीइंगसाठी तयार होत होते...
थंडी म्हटली की पुणे-मुंबईकरांना आठवतो तो पहाटेचा गारवा, सकाळी कोवळ्या उन्हात शेकत बाल्कनीमध्ये बसून प्यायचा गरम चहा आणि सायंकाळी सवाई गंधर्व किंवा वसंतोत्सव अशा कार्यक्रमांमध्ये उत्तम संगीत ऐकत खायचा गरम वडापाव. आपली थंडी मुख्यतः पहाटे आणि रात्री वाजणारी आणि शाल वगैरे गोष्टींनी सहज भागणारी!
कॅनडामध्ये आल्यानंतर मात्र एका वेगळ्याच प्रकारच्या थंडीशी माझी ओळख झाली. हा तसा खूप थंड प्रदेश आहे, असं मी ऐकून होते, पण ऐकणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचं परत एकदा प्रत्यंतर आलं. इथली थंडी कडाक्याची आणि दिवसभर! इथं तापमान मायनस तीस डिग्रीपर्यंत सहज जातं. तुफान बर्फ आणि बोचरं वारं; आणि किमान चार-पाच महिने ही अशी थंडी!