भारतीय पॅकेजिंग उद्योग दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढत आहे. जागतिक पातळीवरील ही वाढ चार ते पाच टक्के आहे. या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.
अभ्यासक्रम
(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग
कालावधी : दोन वर्षे.
पात्रता ः अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाते. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद कॅम्पसमध्ये करता येतो. अभ्यासक्रम चार सत्रांचा आहे. यापैकी तीन सत्रांचा अभ्यासक्रम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. चौथ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या पॅकेजिंग उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करावे लागते.