

Career Guidance
esakal
डॉ. विजय पांढरीपांडे
आधुनिक करिअरने तुम्हाला आनंद दिला पाहिजे; पैसा दुय्यम! कारण लाखो रुपयांचे उत्पन्न असेल आणि मनाला शांती, समाधान नसेल, कामात आनंदाऐवजी फक्त ताणतणाव असेल, तर त्या नोटा काही कामाच्या नाहीत. करिअर निवडताना, मला कशाची आवड आहे, मी काय उत्तम करू शकतो, माझी योग्यता काय, कौशल्य काय, मर्यादा काय, या सर्व बाजूंचा एकत्रित विचार आवश्यक असतो.
दहावी झाली की बारावीची काळजी; बारावी झाली की कॉलेज प्रवेश, शाखा, विषय, कोर्सेस कोणते निवडायचे याची काळजी; अन् मग पदवी प्रमाणपत्र हाती पडले की करिअरची काळजी असे हे आजच्या तरुण पिढीच्या पाठीमागे लागलेले दुष्टचक्र. ही काळजी केवळ तरुणांच्याच मागे लागलेली नाही, यातून त्यांच्या पालकांचीही सुटका होत नाही. याचे मुख्य कारण असे, की आपल्यापैकी बहुतेकांना शिक्षण अन् करिअर या संकल्पनाच नीट समजलेल्या नाहीत. सगळा घोळ गैरसमजुतीतून निर्माण झालेला आहे असे वाटते.
परवा यूट्यूबवर एका पॉडकास्टमध्ये डॉ राजेंद्र बर्वे यांचे एक वाक्य ऐकले. ते म्हणाले, ‘‘या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा वर्गवारीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे!’’ हे केवढे मोठे कटू सत्य आहे! समाजात आधीपासूनच असलेली वर्गवारी आता आपण शिक्षणातही करून टाकली आहे. आधी सायन्स, मग कॉमर्स, त्यानंतर शेवटी आर्ट्स अशी गुणवत्तेची उतरंड. कोणी ठरवले हे? कधी ठरवले हे की सायन्स घेणारे हे आर्ट्स, कॉमर्सवाल्यांच्या तुलनेत अधिक हुशार असतात? मुळात हुशारी, विद्वत्ता कशी ठरवायची? कशी मापायची? आणि हाच निकष लावला, तर संत ज्ञानदेव, तुलसीदास, गालिब, टागोर, शेक्सपिअर ही लेखक मंडळी आर्ट्सची म्हणून न्यूटन, आइन्स्टाईन, मॅक्सवेल या शास्त्रज्ञांच्या तुलनेत कमी ठरवायची असे तर होऊ शकणार नाही ना!