डॉ. आनंद ज. कुलकर्णी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आता केवळ कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवाल्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. जे मेकॅनिकल इंजिनिअर्स, सिव्हिल इंजिनिअर्स उत्तम कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहू शकतात, त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससंबंधित अल्गोरिदम्स तयार करण्यासाठी आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी लागणारे डोमेन नॉलेज असतेच. अशा इंजिनिअर्सना आज प्रचंड मागणी आहे.
मानवाच्या गरजा सतत बदलत असतात. सरकारे, विविध खासगी उद्योग त्या पूर्ण करतात. त्यातून रोजगार उत्पन्न होत असतात, नवनवीन संकल्पनांना उभारी येत असते व उत्पादनांच्या सुधारित आवृत्त्या तयार होत असतात.
ग्राहकांचे प्रतिसाद ओळखून शक्य त्या सुधारणादेखील केल्या जातात. यातून जगभर प्रचंड उद्योग उभारले गेले आहेत. त्यातच जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी जगातील विविध कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. साधारणपणे दुसऱ्या जागतिक युद्धानंतर कॉम्प्युटर क्रांती झाल्यापासून या स्पर्धेने वेग पकडला.
आधी खूपच महाग असलेला कॉम्प्युटर आज तुलनेने कमी, म्हणजे छोट्यात छोट्या उद्योगधंद्यांना व सामान्य माणसाला सहज परवडेल अशा किमतीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानांत जशी भर पडत गेली, तसा प्रत्येकाच्या कामाला वेग येत गेला.
कित्येक नवीन अल्गोरिदम्स, सॉफ्टवेअर्स तयार करणे जसे सहज शक्य होत गेले, तसा १९५२मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या संकल्पनेने जन्म घेतला. दोन-एक दशकांपूर्वी अनोळखी वाटणारी ही संकल्पना गेल्या काही वर्षांत सत्यात उतरली आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आज मोलाचा हातभार लावत आहे.