डॉ. पल्लवी कव्हाणे
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. याचे मूळ प्राचीन असले, तरी त्याचा उपयोग आधुनिक काळातही होतो. योगाभ्यास करणारी व्यक्ती स्वतःला आणि समाजाला अमूल्य योगदान देत असते. म्हणूनच आधुनिक युगात प्रत्येकाने योगाचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करायला हवे.
आपण वावरतो ते युग आधुनिक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, पण मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाला सुविधा जरी प्राप्त करून दिल्या असल्या, तरी त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक समस्याही निर्माण केल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आज आरोग्य, तणावमुक्त जीवन आणि मानसिक शांती यासुद्धा मूलभूत गरजा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योगशास्त्र हे भारतीय ज्ञानतत्त्व एक प्रकाशवाट ठरत आहे.