तुषार प्र. जोशी
पीआरच्या माध्यमातून फक्त माहिती पोहोचवली जात नाही, तर लोकांच्या मनात विशिष्ट भावभावना, विश्वास आणि जाणिवा जागृत केल्या जातात. म्हणूनच आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात पीआर अधिक महत्त्वाचं ठरत आहे.
पीआर अर्थात पब्लिक रिलेशन्स हे करिअर क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा नेहमीच थोडं वेगळं राहिलं आहे. त्यामुळेच ते नव्या पिढीला सतत खुणावतं. जनसंपर्क ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची असली, तरी प्रत्येक दशकात त्याचं स्वरूप, माध्यमं आणि उपयोग याचे आयाम बदलत गेले आहेत. रूढार्थानं ‘पीआर’ला मराठीत जनसंपर्क असं संबोधलं जातं.
मात्र, थोडा सखोल विचार केला तर लक्षात येतं, की हे क्षेत्र केवळ जनसंपर्कापुरतं मर्यादित नसून त्यापलीकडे बरंच काही आहे. एखादी व्यक्ती, संस्था, संकल्पना किंवा उत्पादन यांच्याबाबत दीर्घकाळ सकारात्मक प्रतिमा म्हणजेच ‘पब्लिक इमेज’ निर्माण करणं आणि ती टिकवून ठेवणं हे पीआरचं मुख्य उद्दिष्ट असतं.