विदुला टोकेकर
भाषा हे माणसाच्या माणूसपणाचं एक लक्षण आहे. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत, मानवनिर्मित यंत्र-तंत्राच्या मदतीनं करिअर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर केलं, तरी शिडीच्या शेवटच्या पायऱ्यांवर तुमचा आधार होते, ती भाषाच. ‘लवचिकता, निरंतर प्रशिक्षण आणि अनुकूलन’ या तीन पायांवर भाषिक करिअर चांगलं स्थिर राहतं.
आपलं मूल कविताबिविता करतं, भाषिक विनोदही बऱ्यापैकी करतं, एकुणात त्याला भाषेचं ‘अंग’ आहे, असं पालकांच्या लक्षात आलं, की ते ‘लॅंग्वेज’ हाही एक आधुनिक करिअर ऑप्शन म्हणून विचारात घेऊ लागतात. बाळाला किंवा बाळीला स्वतःलाही शाळा-कॉलेजमध्ये जाणवतं, की आपलं लिहिणं-बोलणं-वाचणं लोकांना आवडतंय, त्यात ते गुंतून राहतायत.
या शक्तीची जाणीव होते आणि आसपास तशा यशोगाथाही दिसू लागतात. त्यामुळे आपणही चाकोरी सोडून, जे आपल्याला आवडतंय, जमतंय त्यात करिअर करावं असं मुलांना वाटू लागतं. हे फार चांगलं आहे. पूर्वी एखाद्यानं लेखनावर उपजीविका करण्याचे मनसुबे रचण्याला ‘भिकेचे डोहाळे’ म्हणून निकालात काढलं जात असे, त्यापेक्षा ही खूपच स्वागतार्ह स्थिती आहे.