

Career Planning Tips
esakal
डॉ. राजश्री जायभाये
बदलत्या काळात करिअरची निवड करताना स्वतःची आवड आणि क्षमता ओळखणे, रोजगाराच्या संधींचा अभ्यास करणे, योग्य मार्गदर्शन घेणे, कौशल्य विकासावर भर देणे आणि तंत्रज्ञानातील बदल स्वीकारणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवून घेतलेला करिअरचा निर्णय व्यक्तीला यश, समाधान आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकतो.
आजचे युग वेगवान तांत्रिक प्रगती, जागतिक स्पर्धा आणि सतत बदलणाऱ्या रोजगार संधींचे आहे. पूर्वी करिअरचे पर्याय मर्यादित होते. डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा सरकारी अधिकारी हीच प्रमुख क्षेत्रे मानली जात होती. मात्र आज माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, उद्योजकता, मीडिया, पर्यटन, क्रीडा, डिझाईन आणि पर्यावरण व्यवस्थापन यांसारख्या अनेक नवीन क्षेत्रांनी करिअरच्या असंख्य संधी निर्माण केल्या आहेत. अशा परिस्थितीत योग्य करिअरची निवड करणे ही केवळ शैक्षणिक नव्हे, तर जीवन घडवणारी प्रक्रिया ठरते. त्यामुळे बदलत्या काळात करिअर निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
सन २०२५च्या एका अहवालानुसार केवळ ४२.६ टक्के भारतीय पदवीधर रोजगारक्षम असल्याचे आढळले. उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांनाही रोजगार मिळवण्यास अडचणी येत आहेत. भारतातील एकूण बेरोजगारी दर ३.१ टक्के असला, तरी पदवीधरांमधील बेरोजगारी दर ११.२ टक्के आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांमधील बेरोजगारी दर सुमारे ९.९ टक्के नोंदवण्यात आला आहे. अनेक युवकांना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात रोजगार मिळत नाही. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार केवळ ८.२५ टक्के पदवीधरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत नोकरी मिळते. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदवीधर कमी कौशल्य लागणाऱ्या किंवा अर्धकुशल क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, तर भारतातील केवळ ४.२ टक्के कामगारांनी औपचारिक व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.