

Caregiver Stress and Mental Health
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
शुश्रूषा करणाऱ्यांवर जबाबदारीचं, महत्त्वाचे निर्णय घेण्याचं ओझं असतं. निर्णय चुकण्याची भीती असते, अनिश्चितता वाटत असते आणि आर्थिक ताणही असतोच. स्वतःसाठी वेळ मिळत नाही. कधी थोडा विसावा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याबद्दल अपराधी वाटतं. मन मोकळं करण्यासाठी कोणीच नाहीये अशी भावना निर्माण होत असते, त्यातूनच एकाकीपणा आणि हतबलता वाढत जाते.
आ युष्यात ताणतणावाचे अनेक प्रसंग येत असतात, त्याची अनेक कारणं असतात. त्यातून मार्गही आपल्यालाच काढावा लागतो. अर्थातच संगोपन करतानासुद्धा वेगवेगळे ताण येतात. मग ते संगोपन बालकांचं, रुग्णाचं किंवा वृद्धांचं असेल. पुष्कळदा हे ताणतणाव आहेत हेसुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे ताण म्हणजे काय, ते कसे ओळखावेत हे आधी समजलं पाहिजे. सगळेच ताणतणाव वाईट नसतात. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी काही ताण आवश्यकसुद्धा असतात. ते सकारात्मक ताण असतात. पर्वतारोहण करताना येतो तसा. त्यात मजा असते, त्यातून प्रेरणा मिळते.