Jukebox: नेहा लिमये
जवळजवळ वर्षभर चाललेल्या या लेखप्रपंचावरच्या प्रतिक्रियांमधून माझ्यासमोर दोन प्रश्नही आले, त्याचा वेध या समारोपाच्या लेखात घ्यावा असं मला वाटलं. पहिला प्रश्न - ‘आपलं’ संगीत इतकं समृद्ध असताना ‘त्यांच्या’ संगीताकडे जायची गरज काय? आणि दुसरा प्रश्न - संगीत ‘कळलं’ तरच आपण चांगले श्रोते आहोत का, थोडक्यात संगीत ऐकताना नक्की काय भूमिका असावी?
ज्युकबॉक्स लेखमालेचा हा शेवटचा लेख लिहिताना मनात एक छान समाधानाची लहर भरून राहिली आहे. ही लेखमाला लिहायला घेतली तेव्हा माझं मन जरा साशंक होतं. आजकाल इतके स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स झालेत. तिथे तुम्ही नुसता विषय, जॉनर, थीम द्या की प्लेलिस्ट हजर असते. बरं, लेखांमध्ये काही क्यूआर कोड, लिंक्सही नसतात, की लगेच जाऊन गाणी ऐकता येतील. पण लेखमालेतल्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रिया येऊ लागल्या, तसा माझ्यातला शंकासुर निवत गेला आणि नवीन विषय हाताळायला मला मजा येत गेली.