सायकल दिन विशेष। डॉ. नरेंद्र पटवर्धन
दरवर्षी ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा होतो. संयुक्त राष्ट्रांनी २०१८मध्ये हा दिवस जाहीर करत सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण, आरोग्याची काळजी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला. सायकल केवळ वाहन नसून ती आहे निसर्गाची सखी, निरोगी जीवनाची साथी! सायकल दिनानिमित्त...
माझ्या एका मित्राला मधुमेहाच्या त्रासानं पछाडलं होतं. अनेक औषधोपचार करूनही त्याची रक्तातील साखर नियंत्रणात येत नव्हती. एके दिवशी त्यानं नक्की केलं, की आता आपल्या आरोग्याचं सूत्र स्वतःच्या हातात घ्यायचं! त्यानं सायकलिंगविषयी माहिती गोळा केली आणि सायकल चालवायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडं जड गेलं, पण सातत्य ठेवलं. केवळ दोन महिन्यांतच त्याच्या आरोग्यात आश्चर्यकारक फरक जाणवू लागला.
रक्तातील साखर आटोक्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचे डोस कमी करण्यात आले आणि शरीरात नवचैतन्य आलं. मानसिकदृष्ट्याही तो अधिक आनंदी व सकारात्मक झाला. आता तो दर आठवड्याला १०० ते १५० किलोमीटर सायकल चालवतो. सायकल त्याचं केवळ व्यायामाचं साधन नाही, तर ती त्याच्या आरोग्ययात्रेची सोबती ठरली.