प्रिती सुगंधी
साहित्य
तीन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, २ टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो, २ कप उकडलेले स्वीट कॉर्न दाणे (मीठ, हळद घालून कुकरमध्ये २ शिट्ट्या आणून शिजवावेत), १ टेबलस्पून लिंबाचा रस, साधे मीठ आणि काळे मीठ चवीप्रमाणे, २ टेबलस्पून बारीक शेव, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून चाट मसाला, १ टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची.
सर्व्हिंगसाठी
एक टेबलस्पून चिंचेची चटणी, १ टेबलस्पून हिरवी चटणी.
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न दाणे घ्यावेत. तुमच्या आवडीप्रमाणे उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे बटरमध्ये भाजूनदेखील घेऊ शकता. नंतर स्वीट कॉर्नमध्ये कांदा, टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, काळे मीठ, साधे मीठ, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकजीव करावे. एका सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार केलेले स्वीट कॉर्न दाण्यांचे मिश्रण घेऊन त्यामध्ये हिरवी चटणी, चिंचेची चटणी मिक्स करावी. बारीक शेव घालून स्वीट कॉर्न चाट सर्व्ह करावा.
साहित्य
दोन कप ताजे दही, मीठ, १ टेबलस्पून पिठीसाखर, १ टेबलस्पून हिरवी चटणी, २ टेबलस्पून चिंचेची चटणी, अर्धा टेबलस्पून पुदिना चटणी, १ कप बारीक शेव, अर्धा टेबलस्पून खारी बुंदी, अर्धा टेबलस्पून धने पूड, १ टेबलस्पून जिरे पूड, १ कप बारीक चिरलेला कांदा, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
सर्वप्रथम परातीत दही, साखर, मीठ घेऊन मिश्रण फेटून घ्यावे. नंतर त्यात जिरे पूड, धने पूड, चाट मसाला, शेव, कांदा, खारी बुंदी घालून मिश्रण एकजीव करावे. सर्व्ह करताना बाऊलमध्ये दही मिश्रण घ्यावे. वरून चिंचेची चटणी, पुदिना चटणी, कोथिंबीर, शेव घालून दही चाट सर्व्ह करावा.