डॉ. सुभाष साळुंके
नैसर्गिक आपत्ती असो, आपत्कालीन सेवेची गरज असो किंवा कोरोनासारख्या महाभयंकर साथीचा उद्रेक असो, अशा प्रत्येक संकटाच्यावेळी आघाडीवर असतात ते सरकारी डॉक्टर. राज्याच्या आदिवासी पाड्यांपासून ते दुर्गम डोंगराळ भागांपर्यंत पोहोचणाऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा म्हणजे हे डॉक्टर. अपुरा औषध पुरवठा, पायाभूत सुविधांची कमतरता, वैद्यकीय उपकरणांची वानवा अशा अनेक आव्हानात्मक अडचणींमध्येही सरकारी डॉक्टर्स अविरतपणे, निःस्वार्थीपणे रुग्णसेवा करत राहतात. रुग्णसेवा हेच त्यांचे व्रत असते.
कोणत्याही आपत्तीच्यावेळी महसूल यंत्रणा किंवा पोलिस प्रशासन परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकते. पण रुग्णसेवा ही केवळ आणि केवळ डॉक्टरच करू शकतो. त्यांना कोणीही पर्याय ठरू शकत नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून रोबोटिक्सपर्यंत तांत्रिक प्रगती झाली असली, तरी मानवातील करुणा, सहवेदना आणि निर्णयशक्ती या भावनिक बुद्धिमत्तेचा प्रत्यय एआयला अजून तरी आलेला नाही. म्हणूनच डॉक्टरांना पर्याय नाही आणि त्यांची भूमिका केवळ सेवा देणाऱ्यांची नसून, जीवन रक्षण करणाऱ्या यंत्रणेचा ते मणका आहेत.