रिपोर्ताज ।संजय करकरे
चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत दिवसभर फिरून मानव आणि प्राणी संघर्षाची व्याप्ती आणि विविध पैलूंची माहिती घेतली. वाघ, जंगल आणि माणूस यांच्यातील नातं केवळ संरक्षणापुरतं मर्यादित न राहता, आता ते सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासाच्या मूलभूत प्रश्नांपर्यंत पोहोचल्याची जाणीव अधिक ठळकपणे समोर आली. वाघांच्या सावलीत राहणाऱ्या माणसांचा धांडोळा घेणारा रिपोर्ताजचा दुसरा भाग...
पावसाच्या ओढीमुळे गावकरी गावातच थांबले होते. मी स्थानिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हळदा आणि आवळगाव या अतिसंवेदनशील भागांतील चौकात पोहोचलो. वाघांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी गावोगावी उभारलेल्या वाघांच्या प्रतिमा अधिकच अस्वस्थ करणाऱ्या होत्या. त्या प्रतिमा म्हणजे ‘इतके लोक गमावले’ या वाक्याचं जणू दृश्यरूप होतं. लोकांच्या तोंडून सतत एकच वाक्य ऐकू आलं ‘फॉरेस्टवाले वाघ सोडतात!’ ही सार्वत्रिक भावना होती.