

The Growing Threat of Online Grooming
esakal
अरविंद रेणापूरकर
पोलिस यंत्रणा आणि कायदे मजबूत असूनही बाल लैंगिक अत्याचार थांबलेले नाहीत. त्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. बहुतांश आरोपी हे मुलांच्या परिचयातील किंवा विश्वासू व्यक्ती असतात. ते आधी मुलांशी आणि पालकांशी विश्वासाचे नाते निर्माण करतात. या प्रक्रियेला ‘ग्रूमिंग’ म्हटले जाते. त्यामुळे पालकांना संशय येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. याशिवाय, अनेक मुले भीती, लाज किंवा धमक्यांमुळे वर्षानुवर्षे तक्रार करत नाहीत.
बाल अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशातच नाही, तर सुरक्षित म्हणवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियातही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.
ऑस्ट्रेलियात कठोर कायदे, सक्षम पोलिस यंत्रणा आणि बालसुरक्षेसाठी स्वतंत्र संस्था असूनही अलीकडच्या काळात बाल लैंगिक अत्याचार आणि शोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. प्रामुख्याने न्यू साउथ वेल्स (एनएसडब्ल्यू) पोलिसांनी या समस्येला थेट महासंकट (Epidemic) असे संबोधत समाजाला इशारा दिला आहे. केवळ गुन्हेगारांना अटक करून हा प्रश्न सुटणार नसून पालक, शाळा, समाज, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सरकारी यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाढते ऑनलाइन शोषण, मुलांना विश्वासात घेऊन केले जाणारे ‘ग्रूमिंग’, तसेच कुटुंबातील किंवा परिचितांकडून होणारे अत्याचार यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.