मिलिंद डी. जोशी माझी लेक अगदी लहान असतानाची गोष्ट. एकदा टीव्हीवर जुनी गाणी पाहत असताना तिनं प्रश्न विचारला, ‘‘लहानपणी तुम्ही बाहेर इकडं-तिकडं बघायचात तेव्हा तुम्हाला रंगीत दिसायचं की ब्लॅक अॅण्ड व्हाइट?’’ मी हसून म्हटलं, ‘‘ऑफकोर्स रंगीत. पण का गं?’’ .‘‘मग तुमची जुनी गाणी ब्लॅक अॅण्ड व्हाइट कशी?’’ मग त्यानिमित्तानं ब्लॅक अॅण्ड व्हाइट आणि रंगीत फोटोंच्या प्रवासाचा पट उलगडला...सुरुवातीला, तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे फोटोग्राफी पूर्णपणे ब्लॅक ॲण्ड व्हाइट होती. तेव्हाच्या फोटोग्राफर्सनी काढलेले अनेक फोटोग्राफ्स आजही अभिजात कलेमध्ये गणले जातात. रंगीत फोटोग्राफीचा शोध लागल्यावर, ती खूपच लोकप्रिय झाली कारण ती अधिक वास्तववादी, जिवंत आणि आकर्षक वाटू लागली. आता फोटोग्राफर्स कॅमेऱ्यामधून पुन्हा बाय चॉइस ब्लॅक ॲण्ड व्हाइट जग पाहू लागले आहेत. असं का घडलं असावं?.माझ्याबाबत घडलं ते असं...मी फोटोग्राफी सुरू केली तेव्हा डिजिटल कॅमेरे नवीन होते. त्यातले रंग प्रिंट्सपेक्षा फारच आकर्षक दिसत. त्यामुळं पाऊस, निसर्ग, रानफुलं हे फोटोमध्ये प्राधान्यानं दिसायचे. पावसाळा संपला की फोटोंचे विषय संपले असं वाटायचं. व्ह्यू फाइंडरमधून पाहता-पाहता लाइट, टोन्स, कॉन्ट्रास्ट, टेक्स्चर यांचा विचार रंगांबरोबर व्हायला लागला. त्यानुसार फोटोंचे विषय आणि दृष्टीही विस्तारत गेली.मी ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोग्राफीकडं वळायला कारणीभूत ठरली ती फ्रेंच दिग्दर्शक फर्नांडो ट्रूबा यांची द आर्टिस्ट ॲण्ड द मॉडेल ही फिल्म. २०१२च्या या ब्लॅक ॲण्ड व्हाइट फिल्ममध्ये नैसर्गिक प्रकाशाच्या अतिशय प्रभावी वापरामुळे प्रत्येक फ्रेम देखणी दिसत होती. त्यावेळी मी नुकताच अजिंठा आणि वेरूळची फोटोग्राफी करून परतलो होतो. ते फोटो मी ग्रे-स्केलमध्ये कन्व्हर्ट करून पाहायला सुरुवात केली आणि परिणामांमुळं चकित झालो. माझ्याच फोटोंकडं नव्यानं पाहू लागलो, प्रयोग करू लागलो. त्यातून मला काही गोष्टी गवसल्या त्या अशा...रंग काहीवेळा अडथळा वाटतात, मुख्य विषयापासून लक्ष विचलित करतात. अशा वेळी तोच फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाइटमध्ये प्रभावी वाटतो..ब्लॅक ॲण्ड व्हाइटमध्ये प्रकाश हाच फोटोचा आत्मा असतो. रंग नसल्यामुळं, छाया-प्रकाशाचं महत्त्व ठळकपणे दिसतं. रंगीत फोटोग्राफीमध्ये रंग लक्ष वेधतात, तर ब्लॅक ॲण्ड व्हाइटमध्ये टोनल रेंज, म्हणजे काळ्या-पांढऱ्या आणि त्यांच्यामधल्या छटांचा वापर, अत्यंत महत्त्वाचा ठरतो. प्रकाशातील सूक्ष्म बदलदेखील फोटोमध्ये मोठा भावनिक आणि दृश्यात्मक फरक घडवू शकतात.डायरेक्शनल लाइट - म्हणजे बाजूने किंवा मागून येणारा प्रकाश - यामुळे कंपोझिशन (रचना) अधिक ठळक होते. पोर्ट्रेटमध्ये चेहऱ्यावरील छाया-प्रकाश व्यक्तिरेखेचे भाव स्पष्ट करतात. गूढता वाढवणारे इफेक्ट्ससुद्धा मिळवता येतात. लँडस्केप फोटोग्राफीमध्ये, ढगांमधून डोकावणारी किंवा झाडांच्या मधून येणारी किरणं दृश्याला नाट्यमय करतात. ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोग्राफीमध्ये प्रकाशातील प्रत्येक बदल अधिक प्रकर्षाने जाणवतो. सावल्या, प्रतिबिंबं, सिल्हुएट्स किंवा सौम्य प्रकाशरेषा या गोष्टी फोटोचं सौंदर्य वाढवतात, आशयघन करतात..लाइट - प्रकाश ही एक जादुई गोष्ट आहे. प्रकाशाच्या योग्य उपयोगानं साधं दृश्यही कलात्मक, अर्थपूर्ण आणि लक्षवेधी होऊ शकतं. प्रकाशाच्या खेळातच ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोग्राफीचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. माझ्या निवडक ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोग्राफ्समधून वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशाची जादू मांडायचा हा प्रयत्न...(मिलिंद डी. जोशी पुणेस्थित ग्राफिक डिझायनर आणि हौशी फोटोग्राफर आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.