श्रेयसी मुजुमदार
सुहीना गुप्ता
आजूबाजूच्या असंख्य लहानशा जिवांना प्रेमळ पालक आणि काळजी घेणारं घर मिळालं, तर त्यांचं आणि पर्यायानं लोकांचं आयुष्यही आनंदमय होऊन जातं. अर्थात ही एकट्यादुकट्याची जबाबदारी नाही. यासाठी एक समूह म्हणून पुढे यायला हवं. पाळीव प्राणी दत्तक घेणं ही एक कृती न राहता चळवळ व्हायला हवी.
कधी कधी आयुष्य अचानक वळण घेतं. अगदी एका छोट्याशा जिवामुळे आपलं सारं विश्व बदलून जातं. माझ्यासोबतही तसंच झालं. माझ्या आयुष्यात चिटोजचं आगमन झाल्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं!
त्यादिवशी खूप पाऊस पडत होता. रस्त्यावर एका कोपऱ्यात काहीतरी हलतंय असं वाटलं. जवळ जाऊन पाहिलं तर मांजरीचं पिल्लू! त्या छोट्याशा पिल्लाची अवस्था खूपच वाईट होती. अंग थरथरत होतं, तिच्यासोबत कोणीच नव्हतं. तिला उचलून घरी आणलं. नाव ठेवलं - चिटोज!
चिटोजला खूप जीव लावला, पण घरी आणलं तेव्हा पाळीव प्राण्याची काळजी कशी घ्यायची हे काहीच माहिती नव्हतं. तिला खायला कसं द्यायचं, ऊब कशी द्यायची हे काहीच माहिती नव्हतं. त्यातच घरी आणेपर्यंतच तिची अवस्था फारशी चांगली राहिलेली नव्हती. मी खूप प्रयत्न केला, पण चिटोज फार दिवस जगली नाही. दुःखानं मन भरून गेलं होतं.