online shopping
Esakal
स्नेहल बाकरे
...बाबा वैतागतात, ‘‘अरे देवा, एका गिफ्टच्या शॉपिंगसाठी इतके ऑप्शन्स! म्हणजे हे तर ‘जरुरत से ज्यादा कभी कुछ नही चाहिये, लेकिन ख्वाईश है की मानती ही नही’ असंच झालं म्हणायचं! बहुतेक गुलजार साहेबांनाही काही खरेदी करताना असाच काही अनुभव आला असावा आणि हे वाक्य त्यांनी यासाठीच लिहिलेलं असावं!’’
‘‘नीता... ए नीता... तू आपल्या फ्रेंड्स ग्रुपमधला हा मेसेज पाहिलास का? श्राव्या आणि आलोक आता नवीन घरात शिफ्ट होतायत. आपल्याला हाऊसवॉर्मिंगला बोलवलंय त्यांनी...’’
इतक्यात चहाचा ट्रे हातात घेऊन नीता बाहेर हॉलमध्ये येते. आई-बाबांनाही चहा देते.
‘‘हो... मी केव्हाच पाहिलाय तो मेसेज. पुढच्या रविवारी जायचंय ना... म्हणजे अजून चांगले सात-आठ दिवस आहेत तयारी करायला.’’
हे ऐकून कपिल जरा गोंधळातच पडतो, ‘‘तयारी? अगं हाऊसवॉर्मिंग त्यांचं आहे ना. आपण त्यांच्या घरी जायचंय ना... मग तू काय तयारी करणार आहेस?’’
घरातला, बाहेरचा असा कुठलाही कार्यक्रम असो, त्याच्या नियोजनाची सर्व जबाबदारी होम मिनिस्टर नीतावरच असल्यामुळे ती कपिलला उद्देशून म्हणते, ‘‘ त्यांनी आपल्याला हाऊसवॉर्मिंगला बोलवलं म्हणजे मोकळ्या हातानं जाऊन कसं चालेल? काहीतरी गिफ्ट आणावं लागेल ना त्यांच्यासाठी...’’
‘‘अरेच्चा हो की! हे तर लक्षातच नाही आलं माझ्या!’’ इति कपिल.