डॉ. गुरुदास नूलकर
फक्त कार्बन उत्सर्जन कमी करून हवामान बदलाचे संकट काही दूर होणार नाही. भारताला आपल्या निसर्गाची सजीवसृष्टी पोसण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे. यासाठी सरकारी संस्थांनी हवामान बदलाच्या अनेक पैलूंचा सखोल अभ्यास करून विविध सामाजिक स्तरांवर असलेल्या धोक्याचा आढावा घ्यायला हवा.
सन २०२५ हे वर्ष मानवी इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा असू शकते. गेल्या दशकाचा अनुभव पाहता, नवीन वर्षात हवामान बदलाशी संबंधित नैसर्गिक आपत्ती अधिक वारंवार अवतरतील आणि त्यांचे आघात अधिक तीव्र असतील अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञ बोलून दाखवत आहेत.
औद्योगिक क्रांतीनंतर अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबर हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढत गेले. पण गेल्या काही दशकांत औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जीवाश्म इंधनांच्या अतिवापरामुळे पृथ्वीच्या वातावरणात मोठे बदल घडले आहेत. यांची निष्पत्ती म्हणजे वारंवार येणारे दुष्काळ, पूर, चक्रीवादळे; आणि आपल्या देशालाही याचा अधिक धोका आहे.