Premium|Homemade Diwali Chivda : दिवाळीच्या फराळासाठी बनवा कोथिंबीर आणि खाकरा चिवडा

Coriander Chivda and Khakhra Chivda Recipes : दिवाळीच्या फराळासाठी बनवा खमंग कोथिंबीर चिवडा आणि कुरकुरीत खाकरा चिवडा. पोहे, शेंगदाणे, पापड आणि मसाल्यांचा वापर करून तयार करा चविष्ट तिखट फराळ.
Homemade Diwali Chivda

Homemade Diwali Chivda

esakal

Updated on: 

राजश्री अनिल बिनायकिया

दिवाळीच्या फराळामध्ये अग्रभागी असतो खमंग, चमचमीत आणि खुसखुशीत चिवडा. गोड पदार्थांबरोबरच चिवड्याची खमंग चव जिभेवर रेंगाळते आणि तोंडाला चांगलंच पाणी सुटतं. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली अपूर्ण असल्यासारखीच वाटते. सर्वांच्या आवडत्या तिखट पदार्थाच्या काही पाककृती...

कोथिंबीर चिवडा

साहित्य

पाचशे ग्रॅम भाजके पोहे, २ वाट्या शेंगदाणे, १ वाटी पंढरपुरी डाळे, १ वाटी खोबऱ्याचे काप, १ जुडी कोथिंबीर, १ टेबलस्पून हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, साखर, १ टीस्पून आमचूर पूड, २ टीस्पून धने पूड,

१ टेबलस्पून तीळ.

कृती

प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरावी व कापडावर पसरवून कोरडी करावी. कोरडी झाल्यावर ती तेलात तळून घ्यावी आणि गार झाल्यावर हाताने चुरून घ्यावी. आता खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व डाळे तळून घ्यावे. हिरव्या मिरचीचे तुकडेही तळावेत. मग तेलात मोहरी, हिंग घालावे. नंतर तळलेले सर्व पदार्थ त्यात घालावेत. सोबत पोहेदेखील घालावेत. मग धने पूड व आमचूर पूड घालावी. चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. शेवटी चुरलेली कोथिंबीर पोह्यात घालावी. मिश्रण पुन्हा मिक्स करावे. अशाच पद्धतीने पालक, पुदिना तळून हिरवागार चिवडा करता येईल.

खाकरा चिवडा

साहित्य

एक वाटी कणीक, ३ वाट्या तळलेल्या किंवा भाजलेल्या पापडांचा चुरा (उडदाचे किंवा मुगाचे पापड), मीठ, लाल तिखट, चवीनुसार पिठीसाखर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, मोहनासाठी तेल, फोडणीसाठी हिंग, हळद, मोहरी.

कृती

सगळ्यात आधी मीठ व मोहन घालून कणीक मळून घ्यावी. मग त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. आता तवा गरम करावा आणि मध्यम आचेवर ठेवावा. तव्यावर पोळी टाकून बाजूने तेल सोडून कुरकुरीत खाकरे करावेत. खाकरे गार झाल्यावर त्यांचा चुरा करून घ्यावा. मग त्यात पापडाचा चुरा मिक्स करावा. त्यानंतर तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मग खाकऱ्याचा चुरा फोडणीत घालावा. आता मीठ, पिठीसाखर, आमचूर पूड, लाल तिखट घालून मिक्स करावे. खाकरा चिवडा तयार. आवडत असल्यास या चिवड्यात मुरमुरे चिवडाही मिक्स करू शकता.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Loading content, please wait...